एक्स्प्लोर
आधार क्रमांक सोशल मीडियावर शेअर करु नका : UIDAI
कुणीही आपला आधार क्रमांक सोशल मीडियावर शेअर करु नये, असं आवाहन आधार जारी करणाऱ्या प्राधिकरणाकडून करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायचे चेअरमन आर. एस. शर्मा यांच्या आधार हॅकिंग चॅलेंजच्या वादानंतर यूआयडीएआयने एक सूचना जारी केली आहे. या सूचनेनुसार, कुणीही आपला आधार क्रमांक सोशल मीडियावर शेअर करु नये, असं आवाहन आधार जारी करणाऱ्या प्राधिकरणाकडून करण्यात आलं आहे.
आधार क्रमांक जाहीरपणे शेअर करणं चुकीचं आहे. कायद्यानुसार तसं करुही नये. आधार एक विशिष्ट ओळख असून त्यावर विविध प्रकारचे फायदे, सबसिडी मिळते. इतरांच्या आधार क्रमांकाचा वापर करणं हे देखील गुन्हा आहे. असं केल्या आधारच्या कायद्यानुसार शिक्षेची तरतूद आहे, असं यूआयडीएआयने म्हटलं आहे.
वादाची सुरुवात कशी झाली?
आधार कार्ड अनिवार्य केल्यामुळे सध्या गोपनीय माहितीबद्दल सुप्रीम कोर्टापासून ते सर्वसामान्यांपर्यंत चर्चा आहे. यातच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायचे चेअरमन आर एस शर्मा यांनी स्वतःचा आधार क्रमांक शेअर करुन ते हॅक करुन दाखवण्याचं आव्हान दिलं.
फ्रान्सच्या एका हॅकरने शर्मा यांचं हे आव्हान स्वीकारलं आणि थेट त्यांच्या आधार क्रमांकाशी लीक असलेला मोबाईल नंबरच ट्विटरवर जाहीर केला.
''तुमचा पत्ता, जन्मतारीख आणि फोन नंबर आधार क्रमांकाद्वारे मिळवला जाऊ शकतो. तूर्तास इथेच थांबतो. आधार क्रमांक सार्वजनिक करणं किती धोकादायक आहे ते तुम्हाला आता तरी कळलं असेल,'' असं ट्वीट एलियट एल्डर्सन याने केलं.
आधारचा डेटाबेस भक्कम असून कुणीही तो हॅक करु शकत नाही. आधारची माहिती गोपनीयच आहे, असा दावा नेहमीच केला जातो. आर. एस. शर्मा यांनीही असाच दावा केला आणि स्वतःचा आधार क्रमांक शेअर केला. एल्डर्सन याने काही तासातच आधार नंबरशी लिंक असलेला फोन नंबरच ट्विटरवर शेअर करत हे आव्हान स्वीकारलं.
विशेष म्हणजे एल्डर्सन या हॅकरने जो नंबर शेअर केला, तो शर्मा यांचा नाही, असंही त्याने सांगितलं. कारण, तो फोन नंबर शर्मा यांच्या सचिवांचा असल्याचाही पुरावा त्याने शेअर केला.
दरम्यान, हा हॅकर एवढ्यावरच थांबला नाही. त्याने जो मोबाईल नंबर शोधला, त्या नंबरने सुरु असलेल्या व्हॉट्सअॅप अकाऊंटचा डीपीही काढून दिला. शिवाय शर्मा आणि हॅकर यांच्यात यावरुन दावे-प्रतिदाव्याचा खेळही रंगला. शिवाय शर्मा यांना ट्वीटर युझर्सनेही अनेक प्रश्न विचारले.
यानंतर शर्मांनी पुन्हा ट्वीट केलं. ''तू सांगतोयस तेवढा चांगला हॅकर नाहीस. या माझ्या आधारशी सर्व बँक अकाऊंट लिंक आहेत. ते तू काढू शकलेला नाहीस.. आणि काढले तरी काय?'' असा टोला शर्मा यांनी लगावला.
आधार प्राधिकरणाचं स्पष्टीकरण
आधार कार्ड जारी करणारी संस्था यूआयडीएआयने यावर स्पष्टीकरण दिलं. सोशल मीडियावर करण्यात येणारा दावा चुकीचा आहे. आधार नंबरने कोणतीही माहिती चोरण्यात आलेली नाही आणि चोरण्यात येऊ शकत नाही, असं यूआयडीएआयने सांगितलं.
आर. एस. शर्मा हे सिविल सर्वंट असून त्यांचा फोन नंबर अनेक वेबसाईटवर उपलब्ध आहे. शिवाय त्यांची जन्मतारीखही आयएएस अधिकाऱ्यांच्या सिविल लिस्टमध्ये आहे. तर ट्रायचे चेअरमन म्हणून त्यांचा पत्ताही वेबसाईटवर आहे. त्याचपद्धतीने ई-मेल आयडीही ट्रायच्या वेबसाईटवर आहे. शर्मा यांची सार्वजनिक माहिती काढूनच ती हॅक केल्याचा दावा केला जात असल्याचं यूआयडीएआयने म्हटलं आहे.
सध्याच्या डिजिटल युगात गुगलसारख्या सर्च इंजिनच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती मिळवली जाऊ शकते आणि ती सार्वजनिक केली जाऊ शकते. त्यामुळे सर्वसामान्यांनी यावर विश्वास ठेवू नये. कारण, आधार डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे, असं आवाहन यूआयडीएआयने केलं.
आपण पॅन किंवा मोबाईल नंबर सर्वसाधारणपणे अनेक ठिकाणी वापरतो. त्यामुळे हे दोन्ही नंबर माहिती असले तरी विविध वेबसाईटच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती मिळवली जाऊ शकते, असं सांगत यूआयडीएआयने नागरिकांना न घाबरण्याचं आवाहन केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
विश्व
Advertisement