ड्रोन हल्ले अन् तस्करी रोखण्यासाठी भारताचा मोठा निर्णय, सीमेवर तैनात करणार अॅण्टी ड्रोन डॉग स्क्वॉड
Anti Drone Dog Squad : अमेरिका आणि इस्रायलप्रमाणेच तस्करी व ड्रोनद्वारे होणारे हल्ले रोखण्यासाठी भारतातील बीएसएफ सीमेवर अल्ट्रा साउंड ऐकण्यास सक्षम असलेल्या जर्मन शेफर्ड अँटी ड्रोन डॉग स्क्वाड तैनात करणार आहे.
Anti Drone Dog Squad : जम्मू-काश्मीर आणि पंजाबनंतर गेल्या काही दिवसांपासून राजस्थानसह आंतरराष्ट्रीय सीमेवर ड्रोन तस्करी आणि हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्याचा पार्श्वभूमिवर अमेरिका आणि इस्रायलप्रमाणेच तस्करी व ड्रोनद्वारे होणारे हल्ले रोखण्यासाठी भारतातील बीएसएफ सीमेवर अल्ट्रा साउंड ऐकण्यास सक्षम असलेल्या जर्मन शेफर्ड अँटी ड्रोन डॉग स्क्वाड तैनात करणार आहे.
राजस्थानच्या सीमेवर दोन ठिकाणांहून 10 किलो हेरॉईन आणि ड्रोन फेकल्याप्रकरणी बीएसएफ आणि पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमेवर अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे बीएसएफने हा निर्णय घेतला आहे.
राजस्थानमधील गंगानगर परिसरात बीएसएफ अल्ट्रा साउंड ऐकू शकणारे जर्मन शेफर्ड अँटी ड्रोन डॉग स्क्वाड तैनात करणार आहे. या आधी हे ड्रोन डॉग स्क्वाड पंजाबच्या सीमेवर तैणात करण्यात आले आहे. आता राजस्थान आणि जम्मूच्या सीमेवर हे स्क्वाड तैनात करण्यात येणार आहे. ग्वाल्हेर मधील टेकनपूर येथी बीएसएफच्या श्वानांसाठीच्या राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात ड्रोनविरोधी श्वान पथक तयार करण्यात आले आहे. सर्वप्रथम हे स्क्वाड पंजाबच्या अटारी सीमेवर तैनात करण्यात आले आहे.
जगातील कोणत्याही देशाकडे कुत्रा संवेदनशील लष्करी किंवा ड्रोन शोधण्याचे तंत्रज्ञान नाही. अलिकडच्या काही वर्षांत अमेरिका आणि इस्रायलने ड्रोनसह इतर ध्वनी उपकरणे शोधण्यासाठी कुत्र्यांना प्रशिक्षण दिले असल्याचे लष्करी तज्ञांचे म्हणणे आहे. दोन वर्षांपूर्वी अरबस्तानातील तेल शुद्धीकरण कारखान्यावर ड्रोन हल्ल्यानंतर दोन्ही देशांनी तंत्रज्ञानावर काम केले. युनायटेड स्टेट्समधील प्रमुख ठिकाणी आवाजाद्वारे ड्रोन शोधण्यासाठी कुत्रे तैनात करण्यात आले आहेत.
भारतीय सुरक्षा दलाने नुकताच पाकिस्तानचा नापाक कट हाणून पाडला आहे. जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये सुरक्षा दलांनी पाकिस्तानचे आणखी एक ड्रोन पाडले आहे. कठुआ जिल्ह्यातील राजबाग पोलीस स्टेशन हद्दीतील तल्ली हरिया चक येथे सीमेवर हे ड्रोन पाडले आहे. या ड्रोनला एक बॉम्बसदृश वस्तू जोडलेली असून या वस्तूचा बॉम्ब निकामी पथक तपास करत आहे.