(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Caste Census : बिहारमध्ये राज्य स्तरावर जातीय जनगणना होणार; नितीश कुमारांचे संकेत
देशभरात जातीय जनगणना व्हावी अशी सर्वच राज्यांची इच्छा असल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले. त्यासाठी पहिला केंद्राकडे मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पाटना : देशात वेगवेगळ्या समाजातील अनेक घटकांकडून जातीनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी होत असताना अशी जनगणना राज्य स्तरावर होऊ शकते असं मत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केलं आहे. त्यासाठी नितीश कुमार हे बिहार विधानसभेतील 10 पक्षांच्या प्रतिनिधींसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. सोमवारी ही भेट घेण्यात येत असून त्यामध्ये जातीय जनगणनेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात येणार आहे.
जातीय जनगणना ही देश स्तरावर व्हावी ही मागणी आपण पंतप्रधानांकडे करणार असल्याचं नितीश कुमार यांनी सांगितलं. असं जर झालं तर त्याचा फायदा संपूर्ण देशाला होणार आहे असंही ते म्हणाले. पण जर देशाच्या स्तरावर जातीय जनगणना होणार नसेल तर आपण राज्यातील लोकांशी चर्चा करून बिहारमध्ये तशी जनगणना करु शकतो असं नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं.
देश स्तरावर जातीय जनगणना व्हावी यासाठीच आपली प्राथमिकता असल्याचं नितीश कुमार यांनी सांगितलं. पंतप्रधानांसोबतच्या सोमवारच्या बैठकीत हाच मुद्दा प्रमुख असल्याचं त्यांनी सांगत यावर सकारात्मक चर्चा होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, "संपूर्ण देशामध्ये जातीय आधारित जनगणना झाली तर त्याचा नक्कीच फायदा होईल. सर्वच राज्यातील लोकांची इच्छा आहे की एकदा तरी जातीय आधारित जनगणना झाली पाहिजे. त्यामुळे कोणत्या जातीची लोकसंख्या किती प्रमाणात आहे ते स्पष्टही होईल, त्याच्या आधारे सर्व घटकांच्या विकासासाठी काम करता येईल."
महत्वाच्या बातम्या :