Narayan Rane : एकनाथ शिंदे शिवसेनेला कंटाळलेत, लवकरच त्यांना आमच्यात घेऊ : नारायण राणे
मनसे आणि भाजप युती होईल का? असा प्रश्न राणे यांना विचारला असता ती झाली तर आनंद होईल अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली.

मुंबई : एकनाथ शिंदे हे फक्त सही पुरतेच मंत्री राहिले असून आता ते शिवसेनमध्ये कंटाळले आहेत. त्यांना आम्ही आमच्यात घेऊ, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आज वसई-विरार भागात आहे.आज नालासोपारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.
एकनाथ शिंदे सही पुरतेच
एकनाथ शिंदे मंत्री असले तरी सही पुरते आहेत. 'मातोश्री'शिवाय ते एकही सही करू शकत नाहीत. ते कंटाळले आहेत. आमच्याकडे आले तर घेऊ, असं सांगतानाच आम्ही मनात आणले तर लवकरच सरकारचे विसर्जन करू, असा दावा राणेंनी या वेळी केला.
पिंजऱ्यात राहणाऱ्यांनी सल्ला देऊ नये
कोरोना पसरू नये म्हणून गर्दी करू नका असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. याबद्दल नारायण राणे यांना विचारलं असता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. 'आम्ही गर्दी वाढवत नाही. लोक गर्दी करत आहेत. काही लोकांना बघून लोक तोंड फिरवतात. आम्ही गाडी भरून माणसं आणत नाहीत. आमच्यासाठी लोक थांबतात. मला आयुष्यात जे पद मिळाले ते लोकांमुळे मिळाले. मला पिंजऱ्यात बसून काही मिळाले नाही. जे काही मिळालं ते जीव धोक्यात घालूनच मिळालं आहे. त्यामुळे पिंजऱ्यात राहणाऱ्यांनी मला सल्ला देऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला
मनसे-भाजप युती झाली तर आनंदच
मनसे आणि भाजप युती होईल का? असा प्रश्न राणे यांना विचारला असता ती झाली तर आनंद होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आघाडीतील बिघाडी पेक्षा युती बरी असं सांगायलाही ते विसरले नाहीत. राष्ट्रवादीच्या उदयानंतर राज्यात जातीवाद अधिक वाढला, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर त्यांना विचारण्यात आलं. तेव्हा मी राज ठाकरे यांचा मुद्दा खोडत नाही, असं सांगून अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांच्या मुद्द्याचे समर्थनही केलं.
नीलम गोऱ्हे यांची शिवसेनेत फरफट
आमदार नीलम गोऱ्हे यांना मी शिवसेनेतं आणलं. त्यांच्या आमदारकीसाठी मी प्रयत्न केले. आता त्यांची त्यांच्याच पक्षात किती फरफट होत आहे, ते पाहा, असा टोलाही राणेंनी लगावला.
रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर मात्र मौन
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी म्हणजे सोडलेला वळू आहे असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यावर नारायण राणे यांना विचारलं असता त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर भाष्य करणं टाळलं.






















