Kalyan Singh Death : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन
Kalyan Singh Death News: ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांनी SGPGI मध्ये अखेरचा श्वास घेतला.
Kalyan Singh Passes Away: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन झालं आहे. त्यांच्यावर बऱ्याच दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांनी SGPGI मध्ये अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते. कल्याण सिंह दोन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले तर राजस्थानचे राज्यपालपदही त्यांनी भुषवले होते. कल्याण सिंह रुग्णालयात दाखल झाल्यापासून यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांना अनेकवेळा भेटले होते. याशिवाय भाजपचे अनेक दिग्गज नेतेही रुग्णालयात जाऊन त्यांची प्रकृती जाणून घेत होते.
कल्याण सिंह यांचा राजकीय प्रवास
- कल्याण सिंह यांचा जन्म 5 जानेवारी 1932 रोजी झाला.
- 1991 मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले.
- कल्याण सिंह दुसऱ्यांदा 1997-99 मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.
- कल्याण सिंह उत्तर प्रदेशच्या राजकारणात हिंदुत्वाचा चेहरा होते.
- बाबरी मशीद पाडण्याची घटना 6 डिसेंबर 1992 रोजी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात घडली. या घटनेनंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला.
- 2009 मध्ये समाजवादी पक्षात सामील झाले.
- 26 ऑगस्ट 2014 रोजी ते राजस्थानचे राज्यपाल झाले.
- 1999 मध्ये भाजप सोडले, 2004 मध्ये पुन्हा भाजपमध्ये सामील झाले.
- 2004 मध्ये बुलंदशहरमधून भाजपचे खासदार झाले.
- 2010 मध्ये कल्याण सिंह यांनी स्वतःचा पक्ष जनक्रांती पार्टी स्थापन केली.
- कल्याण सिंह उत्तर प्रदेशच्या अत्रौली विधानसभेचे अनेकवेळा आमदार होते.
- कल्याण सिंह यांच्या निधनानंतर राज्यात शोककळा
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ट्वीट केले, "उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे राज्यपाल आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे नेते आणि प्रेरणा, श्री कल्याण सिंह 'बाबूजी' यांच्या निधनाबद्दल त्यांना आदरांजली. त्यांचे निधन हे भारतीय राजकारण आणि भाजपसाठी कधीही भरून न येणारे नुकसान आहे. "
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ट्वीट केले की, "आज कल्याणसिंहजींच्या निधनामुळे आपण असे एक महान व्यक्तिमत्व गमावले ज्यांनी आपल्या राजकीय कौशल्य, प्रशासकीय अनुभव आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाने राष्ट्रीय स्तरावर एक अमिट छाप सोडली. ते वंचितांच्या उत्थानासाठी आणि सर्व वर्गाच्या कल्याणासाठी समर्पित होते. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. आपल्या सहज आणि साधेपणामुळे लोकांमध्ये लोकप्रिय होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या विकासाला नवी चालना दिली. राजस्थान आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा दोन्ही राज्यांना लाभ मिळाला. त्यांचा मृत्यू हा राजकारणाच्या एका युगाचा शेवट आहे."
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले, “आम्ही क्षितिजावर एक चमकणारा तारा गमावला आहे, ज्यांनी एकेकाळी सनातनला प्रकाश दिला होता. धर्मासाठी सत्ता नाकारणारे कल्याण सिंह अयोध्येतील रामजन्मभूमीवर मंदिर बांधल्यानंतर पूजा करू शकतील अशी इच्छा आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.ॐ शान्ति.”
काँग्रेस नेते केशव चंद यादव म्हणाले, “उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री श्री कल्याण सिंह जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना धीर देवो. विनम्र श्रद्धांजली. "
भाजप खासदार अर्जुन राम मेघवाल म्हणाले, “उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल, आदरणीय श्री कल्याण सिंह जी यांच्या निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली, सर्व भाजप कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक आणि प्रेरणा. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारण आणि भाजपचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. ॐ शान्ति.”