लष्कराच्या सामानाची ने-आण करण्यासाठी फ्रेट कॉरिडोरची चाचणी ; रेवाडीहून राजस्थानला पोहोचलं सामान
हरियाणातील रेवाडीपासून हा प्रवास सुरु झाला आणि राजस्थानातील फुलेरा इथवर येऊन थांबला.
नवी दिल्ली : एलएसीवर भारत आणि चीनमध्ये तणावाची परिस्थिती असतानाच भारतीय सैन्यानं रेल्वेच्या पूर्णपणे समर्पित अशा फ्रेट कॉरिडोर (डीएफसी) वर सैन्याच्याच एका रेल्वेवर रणगाडे आणि लष्कराचं इतर सर्व सामान लादत त्याच्या वाहतुकीची चाचणी केली. हरियाणातील रेवाडीपासून हा प्रवास सुरु झाला आणि राजस्थानातील फुलेरा इथवर येऊन थांबला.
हल्लीच भारतीय रेल्वेनं सामानाच्या वाहतुकीसाठी फ्रेट कॉरिडोर (डीएफसी) ची सुरुवात केली होती. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या कॉरिडोरचं व्हर्च्युअली उदघाटन केलं होतं. भारतीय सैन्यही रणगाडे, तोफा, वाहनं आणि इतर बऱ्या सामानाच्या वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर करते. याच धर्तीवर ही चाचणी घेण्यात आली.
पँगाँग त्सोमध्ये गस्त घालण्यासाठी सैन्याला मिळाल्या नौका; लडाखमध्ये भारताचं पारडं होणार आणखी जड
लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार अशा प्रकारच्या कॉरिडोरमुळे लष्करी सामानाची वेगानं वाहतूक सहज शक्य होण्यास मदत मिळत आहे. शिवाय या उपक्रमासाठी देशातील सर्वच नागरिकांचं योगदान असल्याची बाबही यातून अधोरेखित होते. या निमित्तानं देशातील संसाधनांचा सुयोग्य वापर आणि विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये असणारा समन्वयही दिसून येतो. रेल्वेच्या एका मालगाडीमध्ये सैन्याच्या पूर्ण रणगाड्याची स्क्वाड्रन, 14 रणगाडे सामावले जाऊ शकतात.