पँगाँग त्सोमध्ये गस्त घालण्यासाठी सैन्याला मिळाल्या नौका; लडाखमध्ये भारताचं पारडं होणार आणखी जड
14 हजार फूट उंचीवर स्थिरावलेल्या पँगाँग त्सो या तलावाची लांबी जवळपास 135 किमी इतकी आहे. याता एक तृतीयांश म्हणजेच 40 किमी इतका भाग भारतीय सीमेत आहे.
लेह : एलएसीवर चीनसोबत सुरु असणाऱ्या सीमावादामध्येच भारतीय सैन्याला आता पँगाँग त्सो तलावात गस्त घालण्यासाठी म्हणून नवी नौका मिळण्यास सुरुवात झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या नौकांचा वापर सैन्य आणि आयटीबीपीकडून करण्यात येत आहे. त्यांचा आकार स्टीमर्सहून मोठा आहे.
मागील वर्षी, चीनसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीनंतर पँगाँग परिसरात गस्त घालण्यासाठी म्हणून 29 नव्या नौकांची मागणी करण्यात आली होती. या नौका भारतातच तयार करण्यात येणार होत्या. यापैरी 12 नौकांची ऑर्डर गोवा शिपयार्डला देण्यात आली होती, तर 17 नौकांचा करार एका खासगी शिपयार्डला देण्यात आला होता. गोवा शिपयार्ड येथे तयार होणाऱ्या नौकांमध्ये बोट्स मशीनगन, सर्विलंस गियर देण्यात आले असून, याची मदत गस्त घालतेवेळी होणार आहे.
तर, खासगी शिपयार्डाला देण्यात आलेल्या ऑर्डरमध्ये 35 फूट लांबीच्या बोट तयार केल्या जात आहेत. याचा वापर सैनिकांची ने - आण करण्यासाठी होणार आहे. या नौकांमध्ये जवळपास दीड डझन सैनिक एकाच वेळी येऊ शकतात. नव्या नौका सध्या सैन्याच्या ताफ्यात येत असून, पुढील काही महिन्यांत संपूर्ण 29 नौका सैन्याला मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या नौकांची गरज का भासली?
सध्याच्या घडीला पँगाँग त्सो भागात गस्त घालण्यासाठी ज्या नौका वापरात आहेत त्या अतिशय लहान अशा स्टीमर बोट्स आहेत. अनेकदा तर चीनच्या मोठ्या नौका भारताच्या या नौकांना टक्कर देत असल्याचंही पाहायला मिलालं आहे. काही वर्षांपूर्वी अशाच घटनेमध्ये भारताची एक नौका पलटल्याचंही सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, चीन आणि भारतामध्ये सुरु असणारा सीमावाद दिवसागणिक आणखी वाढत आहे. भारत आणि चीन मधून 3488 किमी एलएसी याच पँगाँग त्सोमधूनच जातात. त्यामुळं सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय़ घेण्यात आला आहे.