एअर इंडिया विमानाच्या कॉकपिटमध्ये मैत्रिणीला बसवणं महागात, पायलटचा परवाना एक वर्षासाठी रद्द
Air India Cockpit Entry Case : डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, अनधिकृत लोकांना विमानाच्या कॉकपिटमध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही आणि असं करणं नियमांचं उल्लंघन आहे.
Air India Cockpit Entry Case : अनेकदा सोशल मीडियावर बसचालकांच्या हलगर्जीपणाचे व्हिडीओ व्हायरल होतात. चालकाचा हाच प्रवाशांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रयत्न हवेत झाला तर... एका विमानाच्या पायलटनंही असंच कृत्य केलं आहे. एअर इंडियाच्या (Air India) पायलटने त्याच्या अधिकारांचा गैरवापर करत आपल्या मैत्रिणीला विमानाच्या कॉकपिटमध्ये बसवलं आणि प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली. या प्रकरणी डीजीसीएने कारवाई करत पायलटचं लायसन्स एका वर्षासाठी रद्द केलं आहे.
विमानाच्या कॉकपिटमध्ये मैत्रिणीला बसवणं महागात
विमानाच्या कॉकपिटमध्ये मैत्रिणीला बसवणं एअर इंडियाच्या या पायलटला महागात पडलं आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या पायलटवर कारवाई करत त्याचा परवाना एक वर्षासाठी रद्द केला आहे. या पायलटने अधिकारांचा गैरवापर आणि नियमांचं उल्लंघन करत मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बसवलं आणि प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली.
पायलटचा परवाना एक वर्षासाठी रद्द
एअर इंडियाच्या चंदीगड-लेह विमानामधील 3 जून रोजी घडलेली ही घटना समोर आली होती. चंदीगड-लेह फ्लाइटच्या कॉकपिटमध्ये मैत्रिणीला बसल्याप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) 22 जून रोजी, गुरुवारी पायलटचा परवाना एका वर्षासाठी रद्द केला आहे.
याशिवाय, याप्रकरणाबाबत माहिती न दिल्यामुळे विमानाच्या सह-वैमानिकावरही कारवाई करण्यात आली आहे. डीजीएसएने त्याच फ्लाइटच्या सह-वैमानिकाचा परवाना एका महिन्यासाठी रद्द केला आहे. 3 जून रोजी घडलेल्या घटनेनंतर दोन्ही वैमानिकांना चौकशी होईपर्यंत सेवेतून काढून टाकण्याचे आदेश याआधी जारी करण्यात आले होते.
डीजीसीएनं काय म्हटलं?
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) सुरक्षा नियमांनुसार, अनधिकृत व्यक्तींना कॉकपिटमध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही आणि हे नियमांचं उल्लंघन आहे. "मेसर्स एअर इंडिया फ्लाइट AI-458 (चंदीगड-लेह) च्या पायलट-इन-कमांडने 3 जून रोजी एका अनधिकृत व्यक्तीला कॉकपिटमध्ये प्रवेश दिला आणि ती व्यक्ती संपूर्ण फ्लाइट दरम्यान कॉकपिटमध्येच उपस्थित होती."
याआधीही घडलीय अशी घटना
यापूर्वीही एअर इंडियाच्या विमानातील अशी घटना समोर आली होती. एअर इंडियाच्या फ्लाइटच्या कॉकपिटमध्ये मैत्रिणीला बसू दिल्याप्रकरणी एका पायलटवर कारवाई करण्यात आली होती. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) पायलटचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला होता. तसेच पायलटवर कारवाई करतानाच DGCA ने एअर इंडियाच्या निष्काळजीपणाबद्दल 30 लाख रुपयांचा दंडही ठोठावला. 27 फेब्रुवारी रोजी दुबईहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये पायलटने आपल्या महिला मैत्रिणीला फ्लाईटच्या कॉकपिटमध्ये बसवलं होतं.