Delhi Riots | दिल्ली दंगली प्रकरणी जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला अटक
दिल्ली दंगलीप्रकरणी जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला अटक करण्यात आली आहे. दिल्ली दंगलीचा कट रचल्याच्या आरोपात यूएपीए कायद्याअंतर्गत त्याला अटक केली. उमर खालिदला तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावलं होतं आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
![Delhi Riots | दिल्ली दंगली प्रकरणी जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला अटक Activist Umar Khalid Arrested from Delhi in connection with Delhi Riots Case Delhi Riots | दिल्ली दंगली प्रकरणी जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला अटक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/14133926/Umar-Khalid.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : यंदा फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीत झालेल्या दंगलीमागे हात असल्याच्या आरोपात पोलिसांनी रविवारी (13 सप्टेंबर) रात्री उशिरा जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला अटक केली आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा (यूएपीए) [Unlawful Activities (Prevention) Act (UAPA)] अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने 11 तासांच्या दीर्घ चौकशीनंतर खालिदला अटक केली. त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.
दिल्ली दंगलीतील आरोपींसोबत झालेल्या बातचीतचे कॉल रेकॉर्ड तसंच बैठका यांच्या आधारावर उमर खालिदला अटक केली आहे. याशिवाय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात येण्याआधी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोपही दिल्ली पोलिसांनी उमर खालिदवर आरोपपत्रात केला आहे.
2 सप्टेंबरला क्राईम ब्रान्चकडूनही चौकशी दिल्ली दंगली प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रान्चने 2 सप्टेंबर रोजीही काही तास उमर खालिदची चौकशी केली आहे. त्याआधी पोलिसांनी दंगलीशी संबंधित आणखी एका प्रकरणात उमर खालिदविरोधात यूएपीए कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला होता. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रान्चनेही दंगलीचा कथित कट रचल्याप्रकरणी उमर खालिदची चौकशी केली होती. त्याचा फोनही जप्त केला होता.
दिल्ली दंगलीत 53 जणांचा मृत्यू नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात सीएएच्या समर्थक आणि विरोधकांमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर 24 फेब्रुवारी रोजी ईशान्य दिल्लीत दंगल भडकली होती. यामध्ये 53 जणांचा मृत्यू झाला होता तर जवळपास 200 जण जखमी झाले होते.
दंगलीत सामील सर्व जणाच्या भूमिकांचाही तपास : दिल्ली पोलीस दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, "फेब्रुवारीमध्ये ईशान्य दिल्लीत झालेल्या दंगलीत सामील सगळ्यांच्या भूमिकांचा तपास सुरु आहे, ज्यांचा हिंसा पसरवण्याच्या कटात सहभाग होता. तसंच समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते."
कार्यकर्त्यांना खोट्या प्रकरणात गोवण्याचा आरोप चुकीचा : दिल्ली पोलीस "सीएएचा विरोध करणारे आंदोलक तसंच सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना 'खोट्या प्रकरणां'मध्ये गोवलं जास असल्याचा आरोप होत आहे. परंतु तपासाबाबत वाद आणि संशय निर्माण करण्यासाठी काही लोक कोर्टात दाखल आरोपपत्रातील काही वाक्यांचा संदर्भ घेऊन त्याचा वापर करत आहेत. त्यांचा दावा चुकीचा आहे. हे प्रकरण कोर्टात प्रलंबित असताना त्यावर उत्तर देणं योग्य नाही," असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं.
जेएनयू घोषणाबाजी प्रकरणातही खालिदला यापूर्वी अटक 2016 साली जेएनयूमध्ये झालेल्या कथित देशविरोधी घोषणाबाजी प्रकरणात उमर खालिद पहिल्यांदा चर्चेत आला होता. त्या प्रकरणातही त्याला अटक झाली होती. शिवाय जेएनयू विद्यार्थी परिषदेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारसह देशद्रोहाप्रकरणी मुख्य आरोपींमध्ये खालिदचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)