(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur : उपराजधानी बनतेय 'हुक्का पार्लर हब'! शहरात अनेक ठिकाणी भरते नशेची मैफिल
शहरात अनेक ठिकाणी सर्रासपणे रेस्टॅरंट, कॅफे आणि बारमध्ये तरुण-तरुणींना हुक्का पुरविण्यात येत आहे. पोलिसांच्या 'कृपा'दृष्टीमुळे दिवसाढवळ्याच नव्हे तर सकाळी 5 वाजेपर्यंतही अनेक ठिकाणी हुक्का मिळतोय.
नागपूरः कोरोना निर्बंध हटल्यानंतर महाविद्यालयातील वर्ग ऑफलाइन सुरु झाले. त्यामुळे बाहेगावाहून शिकण्यासाठी येणाऱ्या तरुणांची संख्या शहरात वाढली. याचाच फायदा घेत शहरात अनेक ठिकाणी हुक्का पार्लर सुरु आहे. धरमपेठ, बजाजनगर सारख्या शहराच्या मध्यभागी देखील हुक्का पार्लर सर्रास सुरु आहेत, हे विशेष.
'या' भागातील कॅफेमध्ये सर्रास मिळतोय हुक्का
हुक्का पार्लरवर बंदी आहे. मात्र शहरात प्रतापनगर, सदर, त्रिमूर्तीनगर, वर्धमान नगर, बजाजनगर, अंबाझरी, नंदनवन आदी ठिकाणी असलेल्या कॅफेमध्ये तर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना हुक्का दिला जातोय. सायंकाळ झाली तरुणाई याठिकाणी फक्त हुक्काची 'ट्रिप' अनुभवण्यासाठीच येथे पोहोचतात. मात्र पोलिसांची 'अर्थपूर्ण कृपा दृष्टी' असल्यामुळे या हुक्का पुरवणाऱ्यांना कुठलीही भिती नसल्याचे चित्र उपराजधानीत आहे.
सकाळी 5 पर्यंत चालतो 'हा' हुक्का पार्लर
शहरातील धरमपेठ भागात एक हुक्का पार्लरतर सकाळी 4-5 वाजेपर्यंत उघडा असतो. याठिकाणी सीसीटिव्हीचे जाळे आहे. शंकरनगर चौकाकडून येणाऱ्या तसेच लॉ कॉलेज चौकाकडून येणाऱ्या दोन्ही भागातून येणाऱ्या वाहनांवर या कॅफेच्या कॅमेऱ्याची नजर असते. 400 रुपयांमध्ये एक पॉट बनवून इथे दिल्या जातो. कॅफेचा शटर डाऊन असतो, ग्राहक गेल्यावर पायरीवर बसलेला मुलगा लॉक उघडून ग्राहकांना आतमध्ये पाठवून पुन्हा बाहेरून कुलुप लावतो. कॅफेच्या आतमध्ये तरुण-तरणी धुंदीत हुक्काची ट्रीप अनुभवताना दिसून येतात. शहराच्या मध्यभागी अशाच प्रकारे इतर भागातही असे हुक्का पार्लर सर्रास सुरु आहेत हे विशेष. मात्र पोलिसांकडून जाणीवपूर्वक यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे चित्र आहे.
बारमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर छापा
एमआयडीसी भागातील सवाना बारमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेने छापा टाकून संचालकासह पाचजणांना अटक केली. या कारवाईमुळे हॉटेल, हुक्का पार्लर चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रतीक उत्तम ठाकरे (वय 34, रा. मधुबन अपार्टमेंट, खरे टाऊन), निशांत हिमांशू जोशी (वय 27, जगत मिलेनियम अपार्टमेंट, गिरीपेठ), प्रकाश मुकेश गजभिये (वय 31, जयनगर, पांढराबोडी) आणि विजय वासुदेव रामटेके (रा. विजयनगर, वानाडोंगरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
ठाकरे यांचे वानाडोंगरी येथे सवाना बार आणि रेस्टॉरंट आहे. रविवारी तेथे सुरू असलेल्या वीकेंड पार्टीत दारूसोबत बंदी असलेला तंबाखूचा हुक्काही ग्राहकांना दिला जात होता. गुन्हे शाखेला माहिती मिळताच छापा टाकला. हुक्का सर्व्ह करताना आरोपी रंगेहात सापडले. त्यांच्याकडून हुक्क्याचे साहित्य जप्त करण्यात आले.