(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Rain : मुसळधार पावसाने नागपूरकरांची तारांबळ, पुढील दोन दिवसही 'यलो अलर्ट'
प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात आणखी दोन दिवस जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिलेला आहे. विशेषतः गोंदिया, भंडारा, गडचिरोली व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नागपूर : वरुणराजाने नागपुरकरांची जणू परीक्षा घेण्याचे ठरविले की काय, असे वाटू लागले आहे. जो दिवस उजाडतो तो पाऊस घेऊनच येतो. पावसाची ही मालिका बुधवारीही कायम राहीली असून पावसाने दुपारनंतर दमदार हजेरी लावली. शहरातील काही भागात मेघगर्जनेसह तासभर पाऊस बरसला. पावसाच्या या धुवाधार बॅटिंगमुळे शहरातील रस्ते आणि चौक जलमय झाल्याचे बघण्यास मिळाले. तासभर मुसळधार बरसल्यावर नंतर पावसाची रिपरिप सुरु होती. जागोजागी तलाव साचले होते. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे शहरातील एकूणच दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले होते.
मंगळवारी सायंकाळी व रात्री बरसल्यानंतर बुधवारीही वरुणराजा जोरदार बरसला. दुपारी दोनच्या सुमारास काळेकुट्ट आभाळ भरून आल्यानंतर तास दीड तास शहरात जवळपास सगळीकडेच मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. रस्त्यांवर जिकडेतिकडे पाणीच पाणी दिसत होते. अनेक चौकांमध्ये तलाव साचले होते. त्यामुळे ठिकठिकाणी ट्राफिक जॅम झाले. त्यामुळे खोळंबलेली वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. वाहनधारकांना गुडघाभर पाण्यातून वाहने काढताना अक्षरशः कसरत करावी लागली. धो-धो पावसामुळे अनेकांना आडोश्याचा आधार घ्यावा लागला. भर दुपारी अंधार पडल्याने वाहनधारकांना हेडलाईट सुरू ठेवून वाहने चालवाली लागली.
या भागात साचले पाणी
मुसळधार पावसामुळे रामदासपेठ, धंतोलीसह, बजाजनगर, सीताबर्डी, काचीपुरा, खामला, पडोळे चौक, जयताळा, गोपालनगर, स्वावलंबीनगर, सहकारनगर, नरेंद्रनगर, अजनी, बेसा, बेलतरोडी, मनीषनगर, शंकरनगर, गोकुळपेठ, महाल, सक्करदरा, मानेवाडा रोड, हुडकेश्वर, कॉटन मार्केट, लोखंडी पूल, मेडिकल चौक, गणेशपेठ, अंबाझरी, सदर, गड्डीगोदाम, काटोल रोड, मानकापूर, झिंगाबाई टाकळी, गोधनी, नारा-नारी या जवळपास सर्वच भागांमध्ये तलाव साचल्याने चित्र पाहायला मिळाले. तर अनेक वस्त्यांमध्ये घरातही पुन्हा पाणी शिरले.
पुढील दोन दिवसही 'यलो अलर्ट'
प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात आणखी दोन दिवस जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिलेला आहे. विशेषतः गोंदिया, भंडारा, गडचिरोली व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.