Dhule Accident News : भागवत कथेच्या कार्यक्रमाहून परतताना काळाचा घाला, धुळ्यात पिकअप-ईकोची समोरासमोर धडक, चौघांचा जागीच मृत्यू
Dhule Accident News : शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ पिकअप व्हॅन आणि ईको गाडीची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
धुळे : शिंदखेडा (shindkheda) तालुक्यातून एक भीषण अपघाताची (Dhule Accident News) बातमी समोर येत आहे. दसवेल फाट्याजवळ पिकअप व्हॅन आणि ईको गाडीची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भयंकर होता की, यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. नरडाणा येथे भागवत कथेचा कार्यक्रम आटपून परतताना इको व्हॅनला दसवेल फाट्याजवळ भरधाव पिकपने त्यांच्या व्हॅनला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर जण गंभीर गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
वाहनाच चालक मद्यधुंद?
अपघात इतका भयंकर होता की, दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.जखमीला उपचारासाठी हिरे वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे पिकअप वाहनाचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे धुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
लामकानी येथे अपघात, मायलेकाचा मृत्यू
दरम्यान, शुक्रवारी लामकानीकडून कोठारेकडे जाणाऱ्या रस्त्यावर समोरून भरधाव येत असलेल्या कारने दुचाकीस दिलेल्या धडकेत दुचाकीवरील मायलेकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा दोन वर्षाचा मुलगा बचावला आहे. अपघातात एक जण जखमी आहे. सिंधूबाई पिरा नानव्हर व बाळू पिरा नानव्हर अशी मृतांची नावे आहे. सिंधूबाई लामकानी येथे खरेदी करुन आपल्या दोन तान्या लेकरांसह मावस भाऊ भगवान टिळे यांच्या दुचाकीवरुन कोठारेकडे जात होत्या. याच वेळी चिंचवार मार्गे लामकानी धुळे रस्त्यावर गावालगत एक किलोमीटरच्या अंतरावर धुळ्याकडून येत असलेल्या कारचे चालकाकडून नियंत्रण सुटल्याने कारने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत सिंधूबाई पिरा नानव्हर व बाळू पिरा नानव्हर हवेत उडून रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर भगवान टिळे हे गंभीर जखमी झाले तर सिंधूबाई यांचा दुसरा दोन वर्षाचा चिमुकला बचावला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, दोन ट्रक थेट दुकानात घुसले