Amit Shah : कार्यकर्त्यांनी असं लढावं की विरोधकांना बसायला एकही जागा मिळू नये, अमित शाहांचा शिर्डीत भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र
Amit Shah: महाराष्ट्र भाजपचं राज्यस्तरीय महाविजय अधिवेशन अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीत पार पडलं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्गदर्शन केलं.
शिर्डी (अहिल्यानगर) : महाराष्ट्र भाजपनं महायुतीच्या साथीनं राज्याच्या विधानसभा निवडणुकीत सत्ता प्राप्त केल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील महाविजय अधिवेशनातून फुंकलं आहे. या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हजेरी लावली. यावेळी अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीतील विजयापेक्षा मोठा विजय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळाला पाहिजे, असं सांगितलं. कार्यकर्त्यांनी असं लढावं की विरोधकांना बसायला एकही जागा मिळाली नाही पाहिजे, असं अमित शाह म्हणाले. जोपर्यंत भाजप पंचायत ते पार्लमेंट पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत विजय अपूर्ण आहे, असं अमित शाह म्हणाले.
अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीनंतर सर्व विरोधी पक्ष महाराष्ट्रात त्यांचा विजय होईल, अशा संभ्रमात होते. मात्र, तुम्ही सर्वांनी त्या सर्वांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला. महाराष्ट्राच्या जनतेनं ठरवलं की एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच खरं आहे, असं अमित शाह म्हणाले.
मोदींच्या विकासाच्या कामावर जनतेनं शिक्कामोर्तब केलं आहे, असं अमित शाह म्हणाले. मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद संपेल, असं देखील अमित शाह म्हणाले. ग्रामपंचायत ते पार्लमेंट पर्यंत तुम्ही भाजप-एनडीएला विजय मिळवून दिला पाहिजे. या वर्षी मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या महापालिका निवडणुका होणार आहेत, तिथं सर्व जागांवर भगवा फडकवायचा आहे, असं अमित शाह म्हणाले.
आपल्याला भाजपला असं मजबूत बनवायचं आहे की कुणी विश्वासघात करु शकणार नाही. उद्धव ठाकरेंची शिवसेना स्वबळावर निवडणूक लढणार आहे. ममता बॅनर्जी आणि लालू प्रसाद यादव खटपट करत हेत. इंडी आघाडी तुटण्यास सुरुवात झाली आहे, असं अमित शाह म्हणाले.
अमित शाह यांनी त्यांच्या भाषणात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर देखील टीका केली. उद्धव ठाकरे खोटं बोलून मुख्यमंत्री बनले. त्यामुळं जनतेनं त्यांना जागा दाखवून दिली, असं अमित शाह म्हणाले. राज्यातील जनतेनं शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना घरी बसवण्याचं काम केलं. घराणेशाहीचं राजकारण करणाऱ्यांना देखील जनतेनं जोरदार उत्तर दिलंय, असं अमित शाह म्हणाले.
इतर बातम्या :
भाजपकडे EVM च्या कृपेशिवाय आहे तरी काय? अमित शाहंच्या वक्तव्यावर बच्चू कडूंचा टोला