अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, दोन ट्रक थेट दुकानात घुसले
Ahmednagar-Chhatrapati Sambhajinagar Highway Accident : अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. चार वाहने एकमेकांना मागून धडकल्याने अपघात झाला.
अहमदनगर : छत्रपती संभाजीनगरमधील ड्रंक अँड ड्राईव्हची घटना ताजी असतानाच अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर (Ahmednagar-Chhatrapati Sambhajinagar Highway) चार वाहनांचा विचित्र अपघात (Accident News) झाला आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरीपूल येथे चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. चार वाहने एकमेकांना मागून धडकल्याने झालेल्या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सकाळी सहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
ट्रक थेट घुसले दुकानात
या अपघातातील दोन ट्रक रोड सोडून थेट दुकानात घुसले आहेत. अपघातामुळे महामार्गावर दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आता क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू आहे. सध्या अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह, चौघांचा मृत्यू
दरम्यान, अमरावती येथील अजय देसरकर हे अभियंते कुटुंबासह दहा वर्षांनंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून पुण्याला जात असताना दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबे जळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ ही घटना घडली. या अपघातात मृणालिनी अजय बेसरकर (38), आशालता हरिहर पोपळघट (65), अमोघ बेसरकर (सहा महिने), दुर्गा सागर गीते (7) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अजय अंबादास बेसरकर (40), शुभांगिनी सागर गीते (35) या जखमी झाल्या आहेत.
नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात
दरम्यान, शुक्रवारी नगर - मनमाड राज्य मार्गावर येवला तालुक्यातील आंबेवाडी येथे हुंडाई (Hyundai) कारला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. यामुळे हुंडाई कार सुमारे 30 ते 40 फूट लांब रस्त्याच्या कडेला फेकली गेली. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. अपघातग्रस्त गाडीचा पत्रा कापून गंभीर जखमी व मृतदेह बाहेर काढण्यात आले. आकाश रमेश पवार, निलेश दगु शेवाळे असे अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. तर शुभम गंगाधर पानमळे हा चालक गंभीर जखमी झाला आहे.
आणखी वाचा