मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभरात काढणार 'धनुष्यबाण यात्रा'; छ. संभाजीनगरमधून सुरुवात
Maharashtra Politics: 8 किंवा 9 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमधून मुख्यमंत्री शिंदे यांच्या धनुष्यबाण यात्रेला सुरुवात होणार आहे.
Maharashtra Politics: शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तिन्ही घटक पक्षांनी राज्यभरात एकत्रित सभा घेण्याची घोषणा केली आहे. 2 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमधून या सभेला सुरवात होणार आहे. मात्र महाविकास आघाडीच्या याच सभांना उत्तर देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मैदानात उतरणार आहे. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 एप्रिलला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेनंतर मुख्यमंत्री शिंदे राज्यभरात 'धनुष्यबाण यात्रा' काढणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या 'धनुष्यबाण यात्रे'ची सुरवात देखील छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) मधूनच होणार आहे. आठ किंवा नऊ एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमधून मुख्यमंत्री शिंदे यांच्या धनुष्यबाण यात्रेला सुरवात होणार आहे.
जिथे उद्धव ठाकरे सभा घेत आहेत त्याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा होत असल्याचा उल्लेख मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या सभेत केला होता. विशेष म्हणजे असेच काही चित्र आगामी काळात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण ज्या छत्रपती संभाजीनगरमधून महाविकास आघाडी शिंदे-फडणवीस विरोधात रणशिंग फुकणार आहेत. त्याच संभाजीनगरमधून एकन शिंदे यांची धनुष्यबाण यात्रा सुरु होणार आहे. विशेष म्हणजे ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या आहेत, त्याचा मैदानावर एकनाथ शिंदे यांची 'धनुष्यबाण यात्रे'ची सभा होणार आहे. तर आठ किंवा नऊ एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमधून मुख्यमंत्री शिंदे यांच्या धनुष्यबाण यात्रेला सुरवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाविकास आघाडीविरोधात एकटे शिंदे मैदानात...
छत्रपती संभाजीनगर शहरात होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरेंची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर याच सभेला उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरमधून धनुष्यबाण यात्रा काढणार आहे. दरम्यान धनुष्यबाण यात्रेच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांची भव्य सभा देखील होणार आहे. यासाठी उद्धव ठाकरे ज्या मराठवाडा संस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेणार आहेत, त्यापेक्षा मोठ्या मैदानाचा शोध शिंदे गटाकडून घेण्यात येत होता. मात्र त्यापेक्षा मोठा मैदान उपलब्ध न झाल्याने अखेर मराठवाडा संस्कृतिक मंडळाच्या मैदानावर एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. यासाठी शिवसेनेकडून परवानगी मागितली जाण्याची शक्यता आहे. तसेच महाविकास आघाडीतील तीन पक्ष आणि मी एकटा असे दाखवण्याचा प्रयत्न देखील एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न असेल असेही बोलले जात आहे.
छत्रपती संभाजीनगर 'राजकारणाचा केंद्रबिंदू' बनतोय....
राज्याच्या राजकारणात छत्रपती संभाजीनगर शहराचे नेहमीच महत्वाचे स्थान राहिले आहे. राज्यातील अनेक मोठ्या राजकीय घडामोडींचा अनेकदा उगमस्थान छत्रपती संभाजीनगर ठरतो. त्यातच शिवसेनेत झालेल्या बंडखोरीत सर्वाधिक पाच आमदार छत्रपती संभाजीनगरमधूनच मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत गेले होते. तर मंत्रिमंडळात देखील सर्वाधिक तीन मंत्रिपद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला मिळाले आहेत. त्यातच आता शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांकडून राज्यभरात एकत्रित होणाऱ्या सभांची सुरवात देखील छत्रपती संभाजीनगरमधूनच होत आहे. तर याला उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाण यात्रेची सुरवात देखील याच शहरातून होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :