Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर राड्याचा माजी न्यायमूर्तींकडून तपास व्हावा; जलील यांची मागणी
Chhatrapati Sambhaji Nagar : शहरातील किराडपुरा भागात राडा झाला त्यावेळी पोलीस कुठे होते? असा प्रश्न जलील यांनी उपस्थितीत केला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) बुधवारी मध्यरात्री शहरातील किराडपुरा भागात दोन गटात वाद झाला. त्यानंतर दगडफेक आणि पोलिसांची वाहन पेटवून देण्यात आली. या घटनेत 16 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. तर कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाला आहे. त्यानंतर पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी पथकाची स्थापना केली आहे. मात्र एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी यावर आपल्याला विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. तर या सर्व प्रकरणाचा तपास माजी न्यायमूर्तींतर्फे करण्यात यावा अशी मागणी जलील यांनी केली आहे.
याबाबत बोलताना जलील म्हणाले की, शहरातील किराडपुरा भागात राडा झाला त्यावेळी पोलीस कुठे होते? परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस कमी पडले का? कोट्यवधी रुपये खर्च करून स्मार्ट सिटीने बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये पोलीस दिसत आहेत का? असा प्रश्न उपस्थितीत करत जलील यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात झालेल्या राड्याची माजी न्यायमूर्ती यांच्या नेतृत्वाखाली चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील जलील यांनी केली आहे.
हिंदू मोर्चामध्ये भडकाऊ भाषण
दरम्यान या सर्व प्रकरणावर बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, शहरात झालेल्या राड्याला नामांतरासोबत जोडले जात असून, त्यात तथ्य आहे. कारण त्यावेळी काही लोकांनी हिंदू मुस्लिम असं वातावरण खराब करण्याचं काम केलं होतं. परंतु सुदैवाने हा राडा फक्त एका भागापूरता होता, ज्यामुळे बाकी संपूर्ण शहरात शांतता होती. आम्ही केलेल्या 14 दिवसाच्या उपोषणमध्ये एकही भडकाऊ भाषण नव्हते.पण हिंदू मोर्च्यामध्ये भडकाऊ भाषण करण्यात आली. परंतु त्यांच्यावर कोणतेही कारवाई झाली नाही. विशेष म्हणजे परवानगी नसलेल्या हिंदू मोर्चामध्ये दोन मंत्री होते, त्यांच्यासाठी काही वेगळं कायदा आहे का? असा प्रश्न जलील यांनी उपस्थितीत केला.
पोलीस वेळेत पोहचेलच नाही...
छत्रपती संभाजीनगर शहरात बुधवारी झालेल्या राड्याची माहिती मिळताच खासदार इम्तियाज जलील घटनास्थळी पोहचले होते. दरम्यान यावेळी पोलीस घटनास्थळी वेळेत पोहचलेचं नसल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. एवढ्या मोठ्या जमावामध्ये फक्त पंधरा पोलीस काय करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एवढ्या मोठ्याप्रमाणात दगडफेक सुरू होती, पोलिसांचे वाहनं पेटवून दिली जात होती. असे असताना पोलीस कुठे होते? असेही जलील म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Sanjay Shirsat : मविआच्या सभेमुळे परिस्थिती चिघळल्यास आयोजक जबाबदार : संजय शिरसाट