Aurangabad : घरात हीटर लावत असताना घडलं भयंकर, महिलेचा जागीच मृत्यू; औरंगाबादच्या सिल्लोडमधील घटना
Aurangabad : , घरात हीटर लावत असताना विद्युत धक्का बसून एका विवाहितेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
औरंगाबाद : सिल्लोडमध्ये एका धक्कादायक प्रकार समोर आला असून, घरात हीटर लावत असताना विद्युत धक्का बसून एका विवाहितेचा मृत्यू झाला आहे. सिल्लोडच्या रेलगाव येथे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता ही घटना उघडकीस आली आहे. स्वाती विष्णू काजले (वय 23 वर्षे) असे मयत महिलेचे नाव आहे. दरम्यान याची माहिती मिळताच पोलीस देखील रुग्णालयात दाखल झाले होते. तर, शनिवारी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर दुपारी रेलगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. तर या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अधिक माहिती अशी की, सिल्लोडच्या रेलगाव येथील स्वाती काजले या शुक्रवारी सायंकाळी घरात पाणी गरम करण्यासाठी हीटर लावत होत्या. दरम्यान, यावेळी स्वाती यांना हीटरचा शॉक लागला. यात त्या दूरवर फेकल्या गेल्या. ही घटना त्यांचे पती विष्णू काजले यांच्या लक्षात येताच त्यांनी जखमी स्वाती यांना तत्काळ सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी विजय निकाळजे यांनी स्वाती यांना मयत घोषित केले.
हायवाचा विद्युत तारेला स्पर्श, चालकाचा मृत्यू...
दुसऱ्या एका घटनेत दौलताबाद हायवातील मुरूम खाली करत असताना विद्युत तारेला स्पर्श होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवा तीन वाजण्याच्या सुमारास करोडी येथे आरटीओ ऑफीससमोर घडली. मंगलसिंग नरसिंग ठाकूर (वय 47 वर्षे, रा. फतीयाबाद) असे मृताचे नाव आहे.
शरणापूर- सहजापूर रस्त्याचे काम सुरू असून त्या कामावर मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. शनिवारी दुपारी चालक मंगलसिंग ठाकूर हे करोडी येथे आरटीओ ऑफीससमोर मुरूम टाकण्यासाठी हायवा घेऊन आले होते. हायवाची हायड्रोलीक वर केल्यानंतर त्या ठिकाणाहून गेलेल्या विद्युत तारेचा अंदाज चालक मंगलसिंग यांना न आल्यामुळे हायवाच्या ट्रॉलीचा स्पर्श विद्युत तारेला झाला. स्पर्श होताच विद्युत प्रवाह हायवामध्ये उतरल्याने मंगलसिंग ठाकूर यांना शॉक लागल्याने ते जागेवरच बेशुद्ध पडले.
ही घटना त्याचे नातेवाईक चैनसिंग घुसिंगे, कृष्णा ठाकूर व ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी मंगलसिंग यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी मंगलसिंग ठाकूर यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. या घटनेची नोंद दौलताबाद पोलिस ठाण्यात घेण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: