(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhagwat Karad : उमेदवारीसाठी भागवत कराडांची धावाधाव, महायुतीमधील पक्षांच्या नेत्यांची घेतायत भेटीगाठी
Lok Sabha Election 2024 : छत्रपती लोकसभा मतदारसंघातून भागवत कराड उमेदवारीसाठी महायुतीमधील महत्त्वाच्या नेत्यांची भेटीगाठी घेतांना पाहायला मिळत आहे.
Lok Sabha Election 2024 : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency) महायुतीचा (Mahayuti) जागा वाटपाचा तिला अजूनही कायम आहे. अशात भाजपकडून केंद्रीय मंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) देखील लोकसभा मैदानात उतरण्यासाठी इच्छुक आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून भागवत कराड लोकसभेची तयारी करत आहेत. मात्र, महायुतीत शिंदे गटाने (Shinde Group) या मतदारसंघावर दावा केल्याने, भागवत कराड उमेदवारीसाठी महायुतीमधील नेत्यांची भेटीगाठी घेतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज त्यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांची (Ajit Pawar) देवगिरी निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे.
छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेसाठी महायुतीत शिंदे गटासह भाजपकडून दावा केला जातो. मात्र, शिंदे गटाकडून ही जागा सोडली जाणार नाही अशी थेट भूमिका घेण्यात आली आहे. दुसरीकडे भाजप नेत्यांकडून देखील ही जागा आपल्याकडे यावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. अशात भागवत कराड उमेदवारीसाठी महायुतीमधील महत्त्वाच्या नेत्यांची भेटीगाठी घेतांना पाहायला मिळत आहे. आज त्यांनी अजित पवारांची भेट घेतली. तर काही दिवसांपूर्वी त्यांनी शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांची देखील भेट घेतली होती.
शिंदे गटाकडून विनोद पाटलांचे नाव चर्चेत...
एकीकडे भाजपकडून भागवत कराड उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहे, दुसरीकडे शिंदे गट देखील ही जागा सोडण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत तयार नसल्याचे चित्र आहे. शिंदे गटाकडून मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांचे नाव चर्चेत आहे. तर, लोकसभा निवडणुकीसाठी आपण इच्छुक असल्याचं स्वतः विनोद पाटील यांनी देखील सांगितले आहे. विशेष म्हणजे कालच विनोद पाटलांनी मुंबईतील सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. तर, शिंदे गटाकडून देखील विनोद पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत अनेक नेते सकारात्मक असल्याची माहिती मिळत आहे.
संभाजीनगरचा तिढा कायम?
महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पण याचवेळी महायुतीचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे राहावे यासाठी शिंदे गटासह भाजपकडून देखील जोरदार प्रयत्न सुरू आहे. भाजपचे अनेक वरिष्ठ नेते देखील संभाजीनगरसाठी आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. संभाजीनगरच्या जागेवरून थेट दिल्लीत देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, अनेक बैठकांनंतर देखील महायुतीत संभाजीनगरचा तिढा काही सुटताना दिसत नसल्याचे चित्र आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :