(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raosaheb Danve on Ambadas Danve : ठाकरेंच्या गडाला सुरुंग, मराठवाड्यातील 'हा' बडा नेता भाजपत जाणार? रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यामुळे खळबळ!
अंबादास दानवे हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. तिकीट न मिळाल्यामुळे राज्यातील अनेक नेते नाराज आहेत. याच नाराजीमुळे अनेक नेत्यांनी पक्षबदल केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (Uddhav Thackeray Shivena) नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हेदेखील लवकरच भाजपत (BJP) जाणार असल्याचे म्हटले जात आहे. संभाजीनगरची (Sambhajinagar) उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याचं बोललं जातंय. यावरच भाजपचे नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. अंबादास दानवे यांचे विचार आमच्यापेक्षा काही वेगळे नाहीत. ते पूर्वाश्रमीचे भाजपचेच आहेत, असं दानवे म्हणालेत.
रावसाहेब दानवे काय म्हणाले?
आमच्या विचारांशी सहमत असणाऱ्या लोकांना पक्षात आणण्याचं काम आम्ही पहिल्यापासून करत आलो आहोत. ज्या घटना घडतील त्याची माहिती आम्ही तुम्हाला देत राहू, असे अंबादास दानवे म्हणाले. अंबदास दानवे यांच्याशी संपर्क झाला आहे का, अशा प्रश्न रावसाहेब दानवे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना अंबादास दानवे हे पूर्वाश्रमीचे भाजपचेच आहेत. भाजप आणि अंबादास दानवे यांचे विचार काही वेगळे नाहीत. पण ते त्यांच्या पक्षाचं काम करतात आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो. त्यांच्याशी आमचा थेट संपर्क झाला नाही, असे दानवे यांनी सांगितले.
आम्हाला विश्वास आहे की...
त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. संभाजीनगरची जागा निवडून यावी यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत. मला वाटतं की भाजपला अनेक धक्के बसणार आहेत. ठाकरे गटाला शेवटचा धक्का हा 4 जून रोजी बसणार आहे. ही निवडणूक आहे. आम्हाला आत्मविश्वास नडणार नाही याची आम्ही काळजी घेतो. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमचे महाराष्ट्रातून 45 खासदार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.