Crime News: विठुरायाचं दर्शन घेतलं, पंढरपूरवरुन परतताना बुलढाण्याच्या वारकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, झाडाला दोर लटकवून....
Crime News: पंढरपूरमध्ये विठुरायाला डोळे भरुन पाहून घेतलं अन् घरी जाताना आयुष्याची 'वारी' संपवली, बुलढाण्यातील भाविकाचं टोकाचं पाऊल

बुलढाणा : आषाढी एकादशीच्या काही दिवस आधीच बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातून एक दुःखद घटना समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीहून परतणाऱ्या एका वारकऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना रुईछतीश गावाजवळ घडली असून, 62 वर्षीय सुखदेव लक्ष्मण रावे यांनी झाडाला गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. सुखदेव रावे हे चिखली तालुक्यातील मिसाळवाडीचे रहिवासी होते. त्यांचा सलूनचा व्यवसाय शेळगाव आटोळ येथे होता. गेली 25 वर्षे ते पंढरपूरच्या वारीत नियमित सहभागी होत होते आणि वारकरी संप्रदायात त्यांची ओळख आदराने घेतली जात होती.(Buldhana News)
घटनेची माहिती मिळताच अंधेरा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार, "सुखदेव रावे हे अत्यंत धार्मिक वृत्तीचे आणि साधं जीवन जगणारे होते. वारीमध्ये त्यांचा नियमित सहभाग असायचा, त्यामुळे त्यांच्या या टोकाच्या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे." सुखदेव रावे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ना कोणती चिठ्ठी सापडली, ना कोणती स्पष्ट कारणे समोर आली आहेत.
गावकऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, सुखदेव रावे पंढरपूरच्या वारीत अनेक वर्षांपासून अगदी उत्साहाने सहभागी होत होते. ते 25 वर्षांपासून मिसाळवाडीत वास्तव्यास होते. त्यांचा शेळगाव आटोळ येथे सलूनचा व्यवसाय होता. अनेक वर्षांपासून सुखदेव रावे पंढरपूरच्या वारीत सहभागी होत असल्याने त्यांनी वारकरी सांप्रदायात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
विठुरायाची भेट अपूर्णच राहिली! पंढरपुरच्या वारीत ट्रकनं चिरडलं
पंढरीच्या वाटेवर धाराशिवच्या वारकरी महिलेचा अपघाती मृत्यू झाला. शनिवारी रात्री सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास वाखरीजवळ रस्त्यावरून जात असताना त्यांना वाहनाने धडक दिली. रोड कॉस करताना महिलेला दिंडीतील वाहनाने(ट्रक) चिरडले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. उषा व्यवहारे यांचा अकस्मात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आणि वारीत सहभागी झालेल्या इतर महिलां हळहळ व्यक्त करत आहेत. विठुरायाच्या भेटीची आस घेऊन पंढरपूरकडे वाटचाल करणाऱ्या उषाताईंना पंढरीच्या विठोबाचे केवळ काही अंतरच उरले होते. पंढरीच्या वाटेवरच महिलेनं जीव सोडल्यामुळे इतर वारकऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त होत असून सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
























