Buldhana Crime News: माझ्याशी संबंध ठेव, संभाषण सुरु ठेव...; युवकाकडून तरुणीला ब्लॅकमेल, शेगावमधील धक्कादायक घटना
Buldhana Crime News: बुलढाणामधील शेगाव परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Buldhana Crime News: बुलढाणामधील शेगाव परिसरात एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 21 वर्षीय तरुणीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करणाऱ्या युवकाला नागरिकांनी चोप दिला. सदर प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. (Buldhana Crime News)
माझ्याशी संबंध ठेव, संभाषण सुरू ठेव, अन्यथा तुझे माझ्याकडे असलेले अश्लील फोटो व्हायरल करेल, अशी धमकी देत मोहम्मद शाकीर या 27 वर्षीय युवकाला सामाजिक कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. याप्रकरणी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी दिलेल्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर मोहम्मद शाकीरला काल न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची शेगाव शहरात "लव जिहाद" म्हणून मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे व विविध अफवा पसरत आहेत. अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असा आवाहन पोलिसांनी केलं आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन- (Chhatrapati Sambhajinagar News)
सध्या सुरू असलेल्या 10 वी व 12 वी बोर्ड परीक्षेदरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरातील एका परीक्षा केंद्रावर धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून संबंधित शिक्षकाला विद्यार्थिनीच्या नातेवाईकांसह संस्था चालकाने मारहाण केल्याची घटना घडली. संबंधित शिक्षक परीक्षा केंद्रावर गार्डिंगसाठी नियुक्त होता. विद्यार्थिनीशी गैरवर्तन करून तिचा मोबाईल क्रमांक घेतल्याचा तसेच वारंवार फोन करून त्रास दिल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. घडलेला प्रकार विद्यार्थिनीने तत्काळ घरातील व्यक्तींना सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी संस्था चालकासमोर संबंधित शिक्षकाला बोलावले. त्यावेळी त्याने चूक झाल्याचे कबूल केल्याचा दावा करण्यात येत आहे. यानंतर संतप्त नातेवाईकांनी त्याला चोप दिला. संबंधित शिक्षकाने माफी मागितल्याचीही माहिती समोर येत आहे. दरम्यान, या शिक्षकाने इतर विद्यार्थिनींनाही त्रास दिला असावा, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर संबंधित शिक्षकाला तत्काळ निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

























