Maharashtra Politics: शिंदेंचे विश्वासू नरेंद्र भोंडेकर अन् फडणवीसांचे खास परिणय फुकेंमध्ये वादाची ठिणगी; नेत्यांच्या पळवा-पळवीवरही भाष्य, भंडाऱ्यातील राजकारण तापलं
Maharashtra Politics: भंडारा जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचे विश्वासू नरेंद्र भोंडेकर आणि देवेंद्र फडणवीस यांचे खास विश्वासू परिणय फुके यांच्या दरम्यान वादाची ठिणगी पडली आहे.

भंडारा: गेल्या काही दिवसात भंडारा जिल्ह्यातील शिंदेंच्या शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे, आणि त्यामुळेच भंडारा जिल्ह्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे विश्वासू नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे खास विश्वासू परिणय फुके (Parinay Fuke) यांच्या दरम्यान वादाची ठिणगी पडली आहे.
फुकेंना भंडाऱ्याचं राजकारण समजण्यासाठी बराच वेळ लागेल
"भाजपच्या परिणय फुकेंना भंडाऱ्याचं राजकारण समजण्यासाठी अजून बराच वेळ लागेल. परिणय फुकेंनी शिंदे सेनेतून तोडफोड करण्यापेक्षा भाजप वाढवण्यावर फोकस करावा. भंडाऱ्यात भाजपचे तीन आमदार आणि एक खासदार होता आज एकही नाही. फुके यांना विधान परिषदेत निवडून देण्यासाठी मी मतदान केले होते. मात्र, मी निवडून येण्यासाठी फुकेंनी एक तरी सभा घेतली असेल तर सांगावे. मी त्यांच्या भरवश्यावर निवडून आलेला नाही", ही सर्व खळबळजनक वक्तव्ये शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका आमदाराने भाजपच्या आमदाराबद्दल केले आहे. याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
राजकीय समजूतदारीवर प्रश्न उपस्थित
एबीपी माझाने नरेंद्र भोंडेकर यांना भंडारा जिल्ह्यात मित्र पक्षांमध्ये सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणासंदर्भात प्रश्न विचारले आणि भोंडेकर चांगलेच भडकले आणि त्यांनी थेट परिणय फुके यांच्या राजकीय समजूतदारीवर प्रश्न उपस्थित करत जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी आमदार परिणय फुके यांनी विश्वासघात केल्याचा आरोप केला. त्यामुळेच भंडाऱ्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला काँग्रेसच्या नाना पटोलेंच्या सोबत जावं लागल्याचा स्पष्टीकरण ही भोंडेकरांनी दिले आहे.
विधानसभेची निवडणूक मी आपल्याच बळावर लढलो, कोणी काम केले, कोणी नाही हे मला चांगलेच ठावूक आहे. मला अधिक बोलायला लावू नका असे सांगून भोंडेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तर सहकारी बँकेच्या निवडणुकीत नाना पटोले यांच्याशी युती केल्यानंतर परिणय फुके यांनी नरेंद्र भोंडेकर महायुतीत आहेत, त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत कोणाच्या भरोशावर निवडून आले याचा विसर पडला असल्याचे म्हटलं आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल पटेल आणि भाजपचा आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे. तसेच भोंडकर यांना शिवसेनेने मोठे पद दिले आहे. त्यामुळे त्यांना परफॉर्म करून दाखवायचं आहे. याकरिता ते विरोधकांसोबत हातमिळवणी करीत असल्याचा आरोपही फुके यांनी केला आहे.























