मोठी बातमी! ठाकरे गटाच्या माजी आमदाराची गाडी फोडली, आरक्षणावरून तरुण संतप्त
Maratha Reservation : संतप्त मराठा तरुणांनी ही गाडी फोडली आहे. तर, गाडी फोडल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.
बीड: आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाज आक्रमक होतांना पाहायला मिळत सून, ठीकठिकाणी राजकीय नेत्यांना अडवून जाब विचारला जात आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात ठाकरे गटाच्या माजी आमदाराची गाडी संतप्त मराठा तरुणांकडून फोडण्यात आली आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार बदामराव पंडित (Badamrao Pandit) यांची गाडी फोडण्यात आली आहे. पंडित हे मोही माता यात्रेसाठी गेले होते. दरम्यान, मादळमोही येथे त्यांची गाडी फोडली गेली आहे. संतप्त मराठा तरुणांनी ही गाडी फोडली आहे. तर, गाडी फोडल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.
मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. बीड जिल्ह्यात देखील गावागावात मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. कुठे साखळी उपोषण, कुठे रास्ता रोको तर कुठे आमरण उपोषण करण्यात येत आहे. दरम्यान, याचवेळी अनेक गावांनी जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात बंदी घातली आहे. त्यामुळे अनेक नेत्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तर, याचाच फटका माजी आमदार बदामराव पंडित यांना बसला आहे. मोही माता यात्रेसाठी गेलेल्या बदामराव पंडित यांना मराठा समजाच्या तरुणांनी विरोध केला. तसेच, त्यांच्या गाडीवर दगडफेक करून त्यांची गाडी देखील फोडली आहे. यावेळी बदामराव पंडित यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील होते. त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
राजीनामा सत्र सुरु...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरु असतानाच, याच आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक पक्षाच्या पदाधिकारी यांनी राजीनामा देण्याची मोहीम हाती घेतली आहे. सरकारकडून आरक्षण देण्यास विलंब होत असल्याने शिवसेनेचे बीडचे उपजिल्हाप्रमुख परमेश्वर तळेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तळेकर यांच्यासोबत शिंदे गटाच्या इतर पदाधिकाऱ्यांनीही देखील राजीनामा दिले असून, आरक्षण आमच्या हक्काचे अशाप्रकारे शिवसेना कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करण्यात आली आहे. तसेच, धारूर येथील सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण 27 ऑक्टोबर पासून सुरु आहे. उपोषणस्थळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुकाध्यक्ष नागेश शिनगारे यांनी भेट देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी आपल्या तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे असल्याची घोषणा केली. त्यामुळे आगामी काळात आणखी वेगवेगळ्या पक्षाच्या पदाधिकारी यांच्याकडून राजीनामे देण्याची मोहीम हाती घेण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: