Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश, नेतृत्व कोणाकडे?
Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांना इतके बेदम मारण्यात आले होते की, त्यांच्या शरीरात ठिकठिकाणी रक्त साकळले होते.
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला सध्या वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्याप्रमाणे बुधवारी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी गठित करण्यात आली. या एसआयटी समितीमध्ये 10 जणांचा समावेश आहे. पुणे सीआयडीचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याकडे या एसआयटी समितीचे नेतृत्त्व देण्यात आले आहे.
या एसआयटी पथकात बीड सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, केजचे पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस उपमहानिरीक्षक तुळशीराम जगताप, पोलीस हवालदार मनोज वाघ, केज पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक चंद्रकांत काळकुट्टे, पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे व पोलीस शिपाई संतोष गीते यांचा समावेश आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला 24 दिवस उलटल्यानंतरही अद्याप तीन मारेकरी फरार आहेत. तर वाल्मिक कराड याने 22 दिवसांनी स्वत:हून शरणागती पत्कारली होती. त्यामुळे पोलीस आणि सीआयडीच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सध्या वाल्मिक कराड पोलीस कोठडीत असून त्याला बीड शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी सध्या वाल्मिक कराड याची कसून चौकशी करत आहेत. वाल्मीक कराड याच्यावर सध्या फक्त पवनचक्की निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे. मात्र, पोलीस कोठडीतील चौकशीनंतर वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख हत्याप्रकरणात सहभाग असल्याचा गुन्हा दाखल होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
वाल्मिक कराड शरण कसा आला?
- वाल्मीक कराडला अटक करण्यासाठी 9 पथके गठीत करण्यात आली होती
- राज्यात आणि राज्याबाहेर ही पथके तपासात होती
- वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे यांची संपत्ती जप्त करण्यासाठी केज न्यायालयात अर्ज केला
- 13 बँकांना ई-मेल पाठवून बँक खाती सील करण्याची कारवाई केली
- बँकांना पत्र पाठवून 15 खाती गोठवण्यात आली
- वाल्मीक कराडच्या पत्नी मंजिरी आणि ज्योती जाधव यांना चौकशीला बोलाविण्यात आले
- वाल्मीक कराडच्या इतरही नातेवाईकांकडे तपास करण्यात आला
- एकट्या पुण्यात 50 जणांचे जबाब नोंदविण्यात आले
- तीन राज्यात स्वत:च्या गाडीने वाल्मीकने प्रवास केला
- त्यामुळे वाल्मीक कराडला शरण येण्याशिवाय कोणतेही गत्यंतर राहिले नाही
आणखी वाचा