Santosh Deshmukh Beed Morcha : जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडूकं हाती घ्यावं लागेल; मनोज जरांगेंचा थेट इशारा, धनंजय मुंडेंवर निशाणा
Manoj Jarange Patil : काही मंत्र्यांना राज्यात विध्वंस घडवायचा असला तरी आम्ही ते होऊ देणार नाही, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
Manoj Jarange Patil : संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये (Beed) सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी जाहीर सभेतून बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जोरदार हल्लाबोल केला. प्रत्येकाला अटक करा, जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडूक हाती घ्यावं लागेल, असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिलाय.
मनोज जरांगे म्हणाले की, मी काय करतोय, मी काय करणार आहे. यापेक्षा माझ्या समाजाने काय ठरवलं हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी मागे हटणार नाही हा शब्द मी तुम्हाला दिलेला आहे. त्यात मी मागे सरकणार नाही. सुरेश धस म्हणाले की, तुम्हाला जे ट्रोल करत होते तेच मला करत होते. पण मला जे ट्रोल करत होते त्यांना मी घोडा लावलाय. माझ्या जातीवर कोणी अन्याय केला तर मी त्याला सोडत नाही. मग तो कितीही जहागीरदाराची औलाद असू द्या. मराठ्यांना मी आज जाहीरपणाने सांगतो की, जो आमदार, खासदार आणि सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूने बोलत असेल मग तो भाजप, काँग्रेस किंवा कुठल्याही पक्षाचा असू द्या त्याच्या बाजूने ठामपणाने पुढच्या काळात उभे राहायचे. जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलतात तोपर्यंत आपण त्यांच्या बाजूने राहायचे. आपल्याला सोडून पक्षाच्या बाजूने बोलायला लागले तर ढकलून द्यायचे. समाजाच्या बाजूने बोलताय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीमागे उभे राहायचे.
देशमुख कुटुंबाच्या पाठीशी राज्यभरातून उभे राहा
सत्ताधारी आणि विरोधकांनी मुख्यमंत्र्यांकडे जावे. या प्रकरणातील संपूर्ण लोकांना आतमध्ये टाकावे असे बोलावे. मग मोर्चा काढण्याची गरजच काय? जेवढे नाव घेतले आहेत तेवढ्या सगळ्यांना अटक करा. आम्ही तुमच्या मागे आहोत तुम्हाला धक्का सुद्धा लागू देणार नाही. संतोष भैय्याच्या लेकराला दारात बाप दिसत नाही. त्या लेकराचे बापाचे छत्र हरवले आहे. तिला जर दुःख झालं तर तीच्या पाठीमागे कोणी नसेल. तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यभरातून उभे राहावे लागेल. राज्यभर आंदोलनाचे हे लोण पसरले पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा, कोणीही मागे हटायचे नाही, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तर आम्हाला दंडुका हाती घ्यावं लागेल
आमच्या कमेंट केलेल्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले. पण खून केलेला आरोपी तुम्हाला सापडत नाही ही किती मोठी गोष्ट आहे. सरकार गोरगरिबाला न्याय देणार का नाही? जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडुका हाती घ्यावं लागेल. संतोष भैय्याची हत्या झाली. परभणीचे प्रकरण झालं, राजगुरुनगरचं प्रकरण झालं, अंबडमध्ये एका मुलीला फाशी घ्यावी लागली. काही मंत्र्यांना राज्यात विध्वंस घडवायचा असला तरी आम्ही ते होऊ देणार नाही. प्रत्येकाला अटक करा, राज्यपालांची परवानगी घ्या आणि अटक करा. तातडीने उचला नाहीतर राज्यभर हे लोण पसरेल. दोन मंत्री नाही, यात कितीही गेले तरी मला फरक पडणार नाही. संतोष भैय्याला न्याय द्यायचा असेल तर कोणीही मागे हटणार नाही, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा