(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed News: परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाई करण्याची मागणी
Parali Firing: परळी गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. कार्यकर्त्यांनी राेहित पवारांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला असून आज परळी बंदची हाक देण्यात आली आहे.
Beed firing case: बीड जिल्ह्यातील बापू आंधळे हत्या प्रकरण राज्यभर चांगलेच गाजले आहे. परळी गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार राेहित पवारांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता अजित पवार गट आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. राेहित पवारांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात येत असून आज परळी गोळीबार प्रकरणी अजित पवार गटाकडून परळी बंदची हाक देण्यात आली आहे.
यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे दिसून आलं. कार्यकर्त्यांनी रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्याने सरपंच बापू आंधळे यांच्या कुटुंबाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. असं बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या आमदाराविरोधात पक्षाने कारवाई करण्याची मागणी यावेळी अजित पवार गटाकडून करण्यात आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी केली.
राेहित पवारांच्या वक्तव्यावर धनंजय मुंडे समर्थकांचीही जोरदार टीका
परळीत झालेल्या गोळीबार प्रकरणात राेहित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर मंगळवारी धनंजय मुंडे समर्थकांनीही जोरदार टीका केली. तरुण सरपंचाची निर्घृण हत्या झाली तरी रोहित पवारांचे चामडी बजाव आणि राजकीय पोळी भाजण्याचे धाेरण असल्याचा आरोप धनंजय मुंडे समर्थकांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना स्वतः ची आणि आपल्या पक्षाची कातडी वाचवायची इतकी घाई झाली आहे की, ते मयत बापू आंधळे आणि त्याच्या कुटुंबविषयी सहनुभूती दाखवायचे सोडाच, उलट या निर्घृण हत्येतील आरोपीची पाठराखण करत असून, धनंजय मुंडे यांची आणि परळीची बदनामी करत सुटले आहेत. असा आरोप धनंजय मुंडे समर्थकाने केलाय आणि याच वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उद्या परळी बंदची हाक देण्यात आली आहे.
राेहित पवारांनी नेमका काय आरोप केला?
परळीत धनंजय मुंडे यांचं खूप काही चालतं असं नाही. कारण त्यांचा राईट आणि लेफ्ट हँड परळी चालवतात. त्यांच्या वतीने काही करण्यात आलं आहे का, हे पाहिले पाहिजे. कारण आमच्या बबन गिते यांनी परळीत बोगस मतदान झालं हे समोर आणल होतं. त्याचा हा राग असावा. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होतोय की त्यांचा राईट अँड लेफ्ट हँड हे काल दिवसभर आंदोलनातदेखील पाहिला मिळाले. त्यामुळे माझी मागणी आहे यांची देखील चौकशी व्हायला हवी, असे रोहित पवार म्हणाले.
हेही वाचा: