"बबन गीतेंवर गुन्हा दाखल केला असला तरी..." सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणावर रोहित पवारांचं मोठं विधान!
Bapu Andhale Murder Case : परळीतील बापू आंधळे हत्या प्रकरणाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
![mla rohit pawar comment on parali maralwadi bapu andhale murder case allegation against beed police demand quick investigation](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/1879d28824bba9deb7e8f1dd5b9c65001719811735652988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बीड जिल्ह्यातील बापू आंधळे (Bapu Andhale) हत्या प्रकरण सध्या राज्यभरात गाजले आहे. बापू आंधळे हे मरळवाडीचे सरपंच होते. ते अजित पवार गटात होते. त्यांच्या डोक्यात गोळू घालून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या खूनप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते (Baban Gite) यांच्यासह मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून झालेली तसेच खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तींना राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे या हत्याप्रकरणाला हवा मिळालेली आहे. दरम्यान, याच हत्येबाबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी धनंजय मुंडे यांचे नाव घेत मोठा दावा केला आहे.
रोहित पवार यांनी नेमका काय आरोप केला?
परळीत धनंजय मुंडे यांचं खूप काही चालतं असं नाही. कारण त्यांचा राईट आणि लेफ्ट हँड परळी चालवतात. त्यांच्या वतीने काही करण्यात आलं आहे का, हे पाहिले पाहिजे. कारण आमच्या बबन गिते यांनी परळीत बोगस मतदान झालं हे समोर आणल होतं. त्याचा हा राग असावा. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होतोय की त्यांचा राईट अँड लेफ्ट हँड हे काल दिवसभर आंदोलनातदेखील पाहिला मिळाले. त्यामुळे माझी मागणी आहे यांची देखील चौकशी व्हायला हवी, असे रोहित पवार म्हणाले.
स्वच्छ चारित्र्याच्या अधिकाऱ्याकडून करावी
तसेच, पोलिसांनी जरी बबन गीतेंवर गुन्हा दाखल केला असला तरी माझी स्पष्ट मागणी आहे की या प्रकरणाची चौकशी एका स्वच्छ चारित्र्याच्या अधिकाऱ्याकडून करावी, अशी आमची मागणी आहे. आम्हाला त्या ठिकाणी असणाऱ्या पोलीस प्रशासनाबाबत प्रश्न आहेत, असे रोहित पवार म्हणाले.
शिवाजीराव गर्जे यांच्यावर खोचक टीका
आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार गट) शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. शिवाजीराव गर्जे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस असून ते पक्षाची कायदेशीर बाजू सांभाळतात. गर्जे यांच्या संभाव्य उमेदवारीवर रोहित पवार यांनी खोचक भाष्य केलंय. शिवाजीराव गर्जे यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली जात आहे असं आम्हाला कळलं आहे. त्यांचे अभिनंदन आहे. त्यांना हे गिफ्ट मिळालं आहे. शरद पवारांनी मोठ्या विश्वासाने गर्जे यांच्याजवळ कागदपत्रांची चावी दिली होती. त्यांच्यावर कागदपत्र चोरीचा आरोप असल्याची सातत्याने चर्चा होते. याबाबतच गर्जे यांना उमेदवारीचे गिफ्ट मिळाले असावे, असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावला.
परळीतील खुनाचे नेमके प्रकरण काय?
दरम्यान, परळीमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये एक जण जागीच ठारतर दोघेजण गंभीर जखमी झाले होते. परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये गोळीबाराचा हा थरार घडला. या गोळीबारामध्ये मरळ वाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर नंदागौळ येथील ग्यानबा मारोती गित्ते आणि महादेव गीते हे दोघे गोळीबारात गंभीर जखमी झाले. जखमींना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत. मृत झालेले बाबुराव आंधळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात काम करत आहेत. त्यासोबतच जखमी झालेले ज्ञानबा गीते हे सुद्धा धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत तर तिसरे जखमी महादेव गीते हे बबन गीते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत त्यांचे समर्थक आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते (Baban Gite) यांच्यासह मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
सरपंचावर गोळ्या झाडून हत्या, राजकारणाची किनार; बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा का उडाला?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)