Beed Crime News : पत्नी-पत्नीचा वाद टोकाला, गळफास लावून केली दोघांनी आत्महत्या; बीड जिल्ह्यातील घटना
Beed News : राहत्या घरात पती-पत्नीने सोबतच गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे.
बीड: जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे धक्कादायक घटना समोर आली असून, पती-पत्नीमध्ये अचानक सुरू झालेल्या वादाचे पर्यावसान आत्महत्येमध्ये झाले. ज्यात घरात पती-पत्नीने सोबतच गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली आहे. या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. राजू बंडू चव्हाण (वय 31 वर्षे) आणि सोनाली राजू चव्हाण (वय 27 ववर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या पती-पत्नीचे नावं आहेत.
अधिक माहिती अशी की, जातेगाव येथील राजू बंडू चव्हाण हे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले. गावात फिरून चक्कर मारली. यानंतर जातेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणीय उपोषणास सुरु होते. या उपोषणाला भेट देऊन ते घरी परतले. घरी गेल्यावर त्यांनी कुटुंबासोबत जेवणही केले. परंतु जेवणांनतर पती-पत्नीत टोकाचे भांडण झाले. वाद एवढा टोकाला गेला की, दोघांनी सोबतच घरातील आडूला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.
बराच वेळ झाला पण आई-वडील खोलीबाहेर येत नसल्याने मोठ्या मुलीने दरवाजा ठोठवत आवाज दिला. मात्र, आतून कसलाही प्रतिसाद न आल्याने तिने ही गोष्ट तिच्या चुलत आजीला सांगितली. घटना कळताच गावकरी जमा झाले. घरावरील पत्र काढून खोलीत प्रवेश केला असता राजू आणि त्यांच्या पत्नीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. दोघांचे मृतदेह खाली उतरवून याची माहिती तलवाडा पोलिसांनी देण्यात आली.
पोलिसांची घटनास्थळी धाव...
या घटनेची माहीती मिळताच तलवाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, फौजदार स्वप्नील कोळी, बीट जमादार नारायण काकडे, महेश झिकरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यास पाठविले. दरम्यान, आत्महत्येचे कारण वैद्यकीय तपासणीनंतर निष्पन्न होईल असे शंकर वाघमोडे सांगीतले. मात्र या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पत्नीच्या वाढदिवसासाठी आले होते गावी...
राजू चव्हाण हे नाशिकला असतात. परंतु, मागील आठवड्यात पत्नी सोनालीचा वाढदिवस असल्याने गावी आले होते. दरम्यान मंगळवारी ते घराबाहेर पडल्यावर मराठा आंदोलनस्थळी गेले. त्यानंतर ते घरी गेले. घरी पती-पत्नीसह दोन मुलींनी सोबत जेवणही केले. परंतु, त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. यातूनच दोघांनीही राहत्या घरातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :