PMV EaS-E Micro : आकार लहान पण फीचर्स आहे छान! फक्त 4 लाखात येते ही इलेक्ट्रिक मिनी कार, 200 किमीची मिळणार रेंज
PMV EaS-E Micro: मुंबईतील एका कंपनीने एक अशी इलेक्ट्रिक कार बनवली आहे, जी सामान्यांच्या खिशाला परवडेल आणि याची रेंज देखील चांगली आहे.
PMV Electric Car Launch: भारत इलेक्ट्रिक वाहनांचं बाजार झपाट्याने वाढत आहे. मात्र पेट्रोल कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार या महाग असल्याने अनेकांच्या खिशाला या कार्स परवडत नाही. यातच अद्यापही भारतात इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्यासाठी पुरेशी पायाभूत सुविधा निर्माण झालेली नाही, म्हणून ही अनेकजण इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचं टाळतात. यातच आता मुंबईतील एका कंपनीने एक अशी इलेक्ट्रिक कार बनवली आहे, जी सामान्यांच्या खिशाला परवडेल आणि याची रेंज देखील चांगली आहे. यासोबतच या कारमध्ये ग्राहकांना अनेक फीचर्स देखील मिळणार आहे. वाहन उत्पादक कंपनी PMV या महिन्यात म्हणजेच 16 नोव्हेंबरला भारतात आपली मिनी इलेक्ट्रिक कार EaS-E लॉन्च करणार आहे. याच कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
PMV Easy (EaS-E) ही मायक्रो इलेक्ट्रिक कार असेल जी मारुती अल्टोपेक्षा आकाराने लहान असेल. या कारमध्ये चार लोकांची आसनक्षमता असेल. मिळालेल्या माहितीनुसार, या कारची लांबी 2,915 मिमी, रुंदी 1,157 मिमी आणि उंची 1,600 मिमी असेल. त्याचा व्हीलबेस 2,087 मिमी असेल, तर ग्राउंड क्लीयरन्स 170 मिमी असेल. ही अतिशय हलकी इलेक्ट्रिक कार असणार आहे. ज्याचे वजन सुमारे 550 किलो असेल.
PMV EaS-E कारमध्ये 15 kW (20 bhp) PMSM इलेक्ट्रिक मोटरसह 10 kWh लिथियम लोह फॉस्फेट बॅटरी दिली जाऊ शकते. या कारची टॉप स्पीड 70 किमी प्रतितास असेल. कंपनीचे म्हणणे आहे की, ही इलेक्ट्रिक कार तीन प्रकारांमध्ये सादर केली जाईल, ज्याची रेंज प्रति चार्ज 120 किमी ते 200 किमी असेल.
किती असेल किंमत?
कंपनी EaS-E चे मिड व्हेरिएंट आणि टॉप व्हेरिएंट लॉन्च करू शकते, तर बेस व्हेरिएंट नंतर आणले जाऊ शकते. ही कार एकूण दहा आकर्षक रंगांमध्ये लॉन्च होऊ शकते. नवीन PMV EaS-E मायक्रो इलेक्ट्रिक कारच्या 160 किमी रेंजच्या प्रकारासाठी याची एक्स-शोरूम किंमत 4 ते 5 लाख रुपयांपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.
आपल्या कारबद्दल माहिती देताना पीएमव्ही इलेक्ट्रिकचे संस्थापक कल्पित पटेल म्हणाले, “ भारतीय कंपनी म्हणून आम्ही जागतिक दर्जाचे उत्पादन तयार केले आहे. पर्सनल मोबिलिटी व्हेइकल्स (PMVs) नावाच्या कारमध्ये एक नवीन सेगमेंट सादर करण्यासाठी आम्ही सज्ज आहे.'' PMV इलेक्ट्रिकचे संस्थापक कल्पित पटेल म्हणतात की, ही मायक्रो इलेक्ट्रिक कार लॉन्चच्या पहिल्या दिवसापासून संपूर्ण भारतात विकली जाईल, परंतु सुरुवातीला डी2सी (डायरेक्ट-टू-कंझ्युमर) व्यवसाय मॉडेलवर विकली जाईल. दरवर्षी 15,000 वाहन विक्री करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनीच्या चाकण प्लांटमध्ये याची निर्मिती केली जाणार असून याची निर्यात करण्याची कंपनीची योजना आहे.
दरम्यान, वाहन उत्पादक कंपनी महिंदा अँड महिंद्रा ही देखील आपली मिनी इलेक्ट्रिक कार बाजारात सादर करण्यास सज्ज झाली आहे. या कारचे नाव महिंद्रा अॅटम आहे. महिंद्रा भारतात लवकरच 2-डोअर क्वाड्रिसायकल इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. कंपनीने आपली ही कार 2020 ऑटो एक्सपोमध्ये सादर केली होती.
इतर महत्वाची बातमी:
Mahindra Atom: महिंद्रा घेऊन येत आहे 2 डोअर इलेक्ट्रिक कार, मिनी पण दमदार