Sri Sri Ravi Shankar: कोरोना हा आजार नाही तर 'बायोलॉजिकल वॉर' : श्री श्री रविशंकर
Akola News: शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा मूळ शोधलं तरच यावर कायमस्वरूपी उपाय शोधता येतील, असं श्री श्री रविशंकर म्हणाले.
![Sri Sri Ravi Shankar: कोरोना हा आजार नाही तर 'बायोलॉजिकल वॉर' : श्री श्री रविशंकर Akola News Sri Sri Ravi Shankar Corona is not a disease but it is a biological war says Sri Sri Ravi Shankar Sri Sri Ravi Shankar: कोरोना हा आजार नाही तर 'बायोलॉजिकल वॉर' : श्री श्री रविशंकर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/28/03698eacb57d65fb3839049d3f711dac167757268836589_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अकोला: 'कोरोना' या तीन अक्षरी शब्दांनी गेल्या तीन वर्षांपूर्वी जगभरात मोठा धुमाकुळ घातला होता. जगात कोरोनाची कोट्यावधी लोकांना लागण झाली. तर कोरोनामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला. आपल्या देशातही कोरोनामुळे मोठा हाहा:कार उडाला होताय. देशात जवळपास दोन वर्ष लॉकडाऊन होता. लाखो लोकांचा मृत्यू झाला. अनेक घरातील कर्ते व्यक्ती गेल्याने संसार उघडे पडले होते. तर उद्योगधंदे बंद पडल्यानं अनेकांचं दिवाळं निघालं होतं. मात्र, या कोरोना आजाराच्या अस्तित्वावरच 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. ते काल रात्री अकोल्यातील एकवीरा मैदानावर झालेल्या सत्संगमध्ये बोलत होते. कोरोना हे 'बायोलॉजिकल वॉर' होतं, असं श्री श्री रविशंकर म्हणाले. त्यासोबतच कोरोनावरच्या लसींवर त्यांनी संशय व्यक्त केला आहे. त्यापासून किती संरक्षण मिळतं? हा प्रश्नच आहे.
काय म्हणाले नेमके श्री श्री रविशंकर?
हा आजार एक 'बायोलॉजिकल वॉर' (जैविक युद्ध) असल्याचं मी म्हणालो होतो. त्यावेळी किती गहजब झाला होता. तेव्हा लोक आणि आमचे कार्यकर्तेही म्हणायचे, गुरूजी!, तुम्ही असं बोलू नका. तुम्ही शांत राहा. पुढे मी म्हणत असलेलं सिद्ध झालं. कोरोना लसीवर संशोधन केलेल्या अनेक देशांनीही मान्य केलं की यावरील लस या आजारावर परिणामकारक नाही. कोरोनाची लस या आजारावर प्रभावीपणे काम करीत नसल्याचंही ते म्हणालेत. या पार्श्वभूमीवर मी माझ्या वैद्यांना यावर एक प्रभावी औषध तयार करण्याचं सुचविलं. त्यांनी हे आव्हान स्विकारत संपुर्ण देशी औषध तयार केलं. त्याचं नाव आम्ही 'नॉक 19' असं ठेवलं. इतर परदेशी कंपन्यांच्या नावाच्या पार्श्वभूमीवर आम्ही या औषधाला हे नाव दिलं.
विदर्भातील शेतकरी आत्महत्या दु:खदायक : श्री श्री रविशंकर
या सत्संगात श्री श्री रविशंकर यांनी विदर्भात होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांवर चिंता व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा मूळ शोधलं तरच यावर कायमस्वरूपी उपाय शोधता येतील, असं श्री श्री रविशंकर म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी देशी बियाण्याच्या संगोपनावर भर देण्याचं आवाहन शेतकऱ्यांना केलं. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी देशी बिजांचा वापर वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच देशात विविध प्रकारचे देशी बीज असून ते वाचवण्याची सध्या गरज असल्याचा सल्ला त्यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला दिला. गेल्या काही दिवसांमध्ये नदीचे पुनरुज्जीवन, तसेच जलयुक्त शिवाराचे काम झाले. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली असल्याचं श्री श्री रविशंकर यांनी सांगत शेतकऱ्यांना धन्यवाद दिलेत.
अकोला देशातील 'हॅपी सिटी' व्हावं : श्री श्री रविशंकर
अकोला ही राजेश्वराची नगरी आहे. राजांचा राजा असं राजेश्वराचे वर्णन आहे. हे शहर ज्या विदर्भात वसले आहे तो विदर्भ देशाच्या हृदयस्थानी आहे. त्यामुळे विदर्भातील सुंदर अकोल्याला 'हॅपी सिटी' घोषित करण्याचा संकल्प करा, असं आवाहन अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी केलं. यावेळी बोलताना श्री श्री रविशंकर म्हणाले की, कुणी दुःखी नसावे. सर्व प्रसन्न असावे,असे वातावरण तयार करा. सुंदर स्वच्छ शहर होण्यासाठी सगळेच प्रयत्न करतात. त्यातूनच इंदोर देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून नावारूपाला आलं. अकोलाही हे स्वच्छ शहर होतानाच देशातील सर्वाधिक 'आनंदी शहर' म्हणजेच 'हॅपी सिटी' म्हणून शहराचा लौकिक वाढावा यासाठी अकोलेकरांनी प्रयत्न करण्याचा आवाहन त्यांनी यावेळी केलं.
प्रेम हे जीवनाचं अस्तित्व : श्री श्री रविशंकर
प्रेम हे जीवनात अस्तित्व आहे, व्यापार नाही. त्यामुळे कमी दिले, तर जास्त मिळेल असा हा व्यापार नाही. प्रेम हे निर्व्याज आहे. त्यामुळे जेवढे प्रेम द्याल तेवढेच प्रेम मिळेल. नैराश्य झटका, चिंतेत राहू नका, लोकांना प्रेम द्या तुम्हाला प्रेम मिळेल. त्यामुळेच जगण्याची नवी ऊर्जा मिळत राहील असा मंत्र यावेळी श्री श्री रविशंकर यांनी उपस्थित जनसमुदायाला दिला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)