हुंड्याऐवजी मुलीसाठी फिक्स डिपॉझिट, लग्नात प्री-वेडिंगचा व्हिडीओ दाखवला तर उठून जायचं; मराठा समाजाची लग्न आचारसंहिता
आता मराठा समाजानेही आचारसंहिता निर्माण करून फुकटच्या बडेजावाला पायबंद घातलाय ही खरोखर स्वागतार्ह बाब आहे.

Ahilyanagar: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर मराठा समाजातील हुंडा व एकूणच लग्नसमारंभातील वाढता दिखावा आणि लग्नातील अनाठायी खर्चावर समाजातील लोकांकडूनच बोट ठेवले गेले . अहिल्यानगरमधील मराठा समाजाने अत्यंत पुरोगामी पाऊल उचलत समाजातून हुंडा हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. तसेच लग्नातल्या बडेजावाला काट मारणारी एक आचारसंहिताच जाहीर केली आहे.
या आचारसंहितेच्या प्रसार व प्रचारासाठी लग्न सोहळे साधे सुसंस्कारित आणि हुंडामुक्त व्हावेत यासाठी अहिल्यानगर येथे मराठा लग्न आचारसंहिता संमेलन 2025 भरवण्यात आलं . हुंड्याऐवजी मुलीच्या नावाने मुदत ठेव, प्री-वेडिंगचा व्हिडिओ जर लग्नात स्क्रीनवर दाखवला तर उठून जावं, डीजे ऐवजी पारंपारिक वाद्य वापरावीत/,लग्न सोहळा 100 ते 200 लोकांमध्ये करावा अशा अनेक मुद्दे या संमेलनात सांगण्यात आले. या संमेलनाला हभप भास्करगिरी महाराज, हभप जंगले महाराज शास्त्री, पद्मश्री पोपटराव पवार ,आमदार संग्राम जगताप, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे यांच्यासह मराठा समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित होते .
काय आहे मराठा समाजाचे लग्न आचारसंहिता ?
या आचारसंहितेनुसार, लग्नात हुंडा देणे-घेणे पूर्णतः टाळावे. त्याऐवजी मुलीच्या नावावर फिक्स डिपॉझिट करावे, असा सल्ला समाजाने दिला आहे. याशिवाय, लग्नात प्री-वेडिंग फोटोशूट किंवा व्हिडीओ दाखवणे टाळावे, अन्यथा विवाहस्थळी उपस्थित असलेल्या प्रतिष्ठित पाहुण्यांनी समारंभातून उठून जावे, असा ठाम निर्णय घेण्यात आला आहे.
आचारसंहितेतील प्रमुख मुद्दे:
1. लग्न सोहळा (100/200) मर्यादित लोकात केला जावा.
2. प्री-वेडिंग प्रकार बंद करावा. केलाच तर तो लग्न सोहळ्यात जाहीर दाखवू नये.
3. कसल्याही परिस्थितीत लग्न वेळेवरच लावावे.
4. लग्नात डीजे नको.पारंपरिक वाद्य, लोक कलावंतांना संधी द्या.
5. कर्ज काढून लग्नात खर्च करू नये. मराठा समाजात लग्नाच्या कर्जामुळेच अनेक आत्महत्या झालेल्या आहेत.
6. नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण-तरुणींना पायबंद घालावा.
7. हार घालताना नवरा नवरीला उचलू नका.
8. लग्नात फक्त वधूपिता आणि वर पिता यांनीच फेटे बांधावेत. पाहुण्यांचे फेटे आणि इतर सत्कार बंद करावेत.
9. लग्न, वाढदिवस, उद्घाटन कार्यक्रमात, पुस्तके, झाडाची रोपे किंवा रोख स्वरूपात आहेर करावेत.
10. लग्नात प्रमुख व्यक्तीच्या हस्ते सोन्याचे दागिने, गाडीच्या चाव्या, वस्तू देऊ नयेत. देखावा करू नये.
विशेष म्हणजे असेच नियम याआधी आगरी समाजानेही तयार केले आहेत. कोकणातही सर्व समाजांच्या लग्नात कित्येक पिढ्या हुंडा, देणीघेणी, मानपान होत नाहीत. तसंच लग्नाचा खर्चही अर्धा अर्धा केला जातो. आता मराठा समाजानेही आचारसंहिता निर्माण करून फुकटच्या बडेजावाला पायबंद घातलाय ही खरोखर स्वागतार्ह बाब आहे. मराठा समजातील धुरिणांनी यावेळी हुंडा देणार नाही आणि हुंडा घेणार नाही असा दंडक घालून दिला आहे. ज्या कुटुंबामध्ये महिलांचा छळ होतो हुंडा घेतला जातो, त्या कुटुंबाशी समाज रोटी – बेटी व्यवहार करणार नाही असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
























