Ahmednagar Politics : प्रवीण घुले भाजपत जाणार, रोहित पवार यांना धक्का
Ahmednagar Politics : अहमदनगरचे (Ahmednagar) काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले हे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांचा भाजप प्रवेश हा रोहित पवार यांच्यासाठी मोठ धक्का समजला जात आहे.
Ahmednagar Politics : अहमदनगरचे (Ahmednagar) काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले (Praveen Ghule) हे भाजपच्या वाटेवर आहेत. प्रवीण घुले यांनी दोनच दिवसांपूर्वी भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांची भेट घेतली होती. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यानुसार राष्ट्रवादी आणि इतरही पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना भाजपमध्ये खेचण्याचे सपाटाच लावला आहे. काही दिवसांपूर्वीच जामखेड तालुक्यातील राजुरी, बांगरवस्ती, डोळेवाडी आणि खर्डा परिसरातील 200 कार्यकर्त्यांनी राम शिंदे यांच्या निवासस्थानी भाजपात प्रवेश केला होता. आता काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले हेही लवकरच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
विकासासाठी सत्तेसोबत राहणं आवश्यक : प्रवीण घुले
प्रवीण घुले हे कर्जतमधील काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना त्यांनी चांगली साथ दिली. परंतु आता त्यांनी आपली भूमिका बदलल्याचं दिसतं. राम शिंदे यांची विधान परिषदेवर झालेली निवड आणि त्यानंतर राज्यात झालेले सत्तापरिवर्तन यामुळे या प्रक्रियेला वेग आला. सोमवारी (28 नोव्हेंबर) रात्री कर्जतमधील गोदड महाराज मंदिरात त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मतदारसंघाच्या विकासासाठी सत्तेसोबत राहणे आवश्यक असल्याने निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे घुले यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
प्रवीण घुले यांची रोहित पवार आणि काँग्रेसवर नाराजी
आमदार रोहित पवार आणि काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर प्रवीण घुले यांची नाराजी असल्याचे बोलले जात आहे. आपल्याला कर्जत नगरपंचायत निवडणूक स्वतंत्र लढवण्याची इच्छा होती, परंतु पक्षाने ते मान्य केलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत जावं लागलं. मात्र यामुळे पक्षाचे नुकसान झालं. याचवेळी त्यांनी रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीवरही आक्षेप घेतला. रोहित पवार विश्वासात घेऊन काम करत नाहीत. तसंच योग्य तो मानसन्मान मिळत नाही, असं त्यांनी म्हटलं. तसंच प्रवीण घुले यांच्याकडे आगामी विधानसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार म्हणूनही पाहिले जात आहे.
कर्जत तसेच जामखेड तालुक्यात प्रवीण घुले यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी घुले हे भाजपचे भावी उमेदवार मानले जाऊ लागले आहेत. परंतु त्यांचा भाजप प्रवेश हा रोहित पवार यांच्यासाठी मोठ धक्का समजला जात आहे.