Ahmednagar : कांद्याला 400 ते 500 रुपये दर मिळत असताना सरकार झोपले होते का? अहमदनगरच्या शेतकऱ्यांचा सवाल
Ahmednagar News : केंद्र सरकार कांदा खरेदी करणार असल्याची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
![Ahmednagar : कांद्याला 400 ते 500 रुपये दर मिळत असताना सरकार झोपले होते का? अहमदनगरच्या शेतकऱ्यांचा सवाल Ahmednagar News Angry reaction from farmers after central government announced to buy onion nafed maharashtra Ahmednagar : कांद्याला 400 ते 500 रुपये दर मिळत असताना सरकार झोपले होते का? अहमदनगरच्या शेतकऱ्यांचा सवाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/22/67bbf7e4addc16b92ef521c845318d701692700842386738_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्र सरकार कांदा खरेदी करणार असल्याची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. 'आता निर्णय घेऊन काय फायदा, आमचा कांदा सडून गेलेला आहे,' अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. उशिरा निर्णय घेतल्याचे सांगत शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
कांदा निर्यातीवर 50 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानंतर त्याचे पडसाद आजही उमटत असून आज राहुरीसह श्रीरामपूर (Shrirampur) व राहुरी बाजार समितीत कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. एकीकडे शेतकऱ्यांचा विरोध सुरू असताना केंद्र सरकारने 2410 रुपये प्रति क्विंटल दराने महाराष्ट्रातील 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असून नाशिक (Nashik), अहमदनगरमध्ये (Ahmednagar) विशेष खरेदी केंद्र उभारणार येणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मात्र शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल असल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला 400 ते 500 रुपये दर मिळत असताना सरकार झोपले होते का? असा सवाल देखील शेतकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान यावेळी शेतकरी म्हणाले की, ज्यावेळी कांद्याचे भाव पडलेले होते. कवडीमोल भावात कांदा विकला जात होता. त्यावेळी हा निर्णय घेणं गरजेचं होतं. हा निर्णय घ्यायला सरकारने उशीर केला असून आज 20 टक्के कांदा शिल्लक असताना हा घेतलेल्या या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. आमच जे आंदोलन सुरू आहे ते असं सुरू राहील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवी मोरे यांनी दिला आहे. तर एकूण कांद्याच्या उत्पादनापैकी 50 टक्के कांदा हा फेकून देण्याची वेळ सरकार शेतकऱ्यांवर आली असून अनेकांचा कांदा पावसामुळे चाळीत सडला असल्याने त्यामुळे या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही.
शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय नाही...
सध्या शेतकऱ्याकडे अवघा दहा ते वीस टक्के कांदा शिल्लक असून तीनशे रुपये अनुदानाची घोषणा यापूर्वी झाली ते अजून मिळाल नाही. पावसामुळे कांदा सडला आहे. हे सगळं जर पाहिलं तर जाहीर केलेला भाव योग्य नाही. आता दिलेला हा भाव म्हणजे शेतकऱ्याची केलेली चेष्टा असून स्वाभिमानी शेतकरी संघटना याचा निषेध करतो आहे. सरकारने दिलेला भाव परवडणारा नसून आगामी काळात कांदा लागवडीसह इतर कामे असताना कांद्याला चांगला भाव देणे आवश्यक आहे. मात्र सद्यस्थितीत 10 ते 20 टक्केच कांदा शिल्लक असल्याने अशातच केंद्र सरकारने निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना परवडणारे नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
कांदा खरेदी केंद्र सुरु
महाराष्ट्रातील कांदा प्रश्नी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीस केंद्र सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. तसेच 2 हजार 410 प्रतिक्विंटल या दराने कांद्याची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यानुसार आजपासून लागलीच नाशिकसह अहमदनगर येथील नाफेडमार्फत कांदा खरेदी केंद्र सुरु करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)