Ahmednagar News : दूध संघचालक तुपाशी, शेतकरी उपाशी; सरकारच्या फसव्या दूध दरवाढी विरोधात स्वाभिमानीचे राहुरीत आंदोलन
सरकारनं केलेली दुधाची दरवाढ ही फसवी असल्याचे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
Ahmednagar News : राज्य सरकारनं गायीच्या दुधाला 34 रुपयांचा दर देण्याचा अध्यादेश काढला आहे. मात्र, या दरवाढीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना (swabhimani shetkari sanghatana) आक्रमक झाली आहे. ही दुधाची दरवाढ फसवी असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं म्हटलं आहे. याविरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी दूध संघचालक तुपाशी, शेतकरी उपाशी अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
तेलंगणा सरकारप्रमाणेच दुधाला पाच रुपयांचे अनुदान द्या
राहुरी कृषी बाजार समितीसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केलं. अहमदनगर-मनमाड हा महामार्ग स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अडवला होता. दुध संघचालक तुपाशी... शेतकरी उपाशी अशी घोषणाबाजी यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. दूध दरासह दुधाला तेलंगणा सरकारप्रमाणं पाच रुपयांचे अनुदान देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. या महामार्गावरच दुधाने अभिषेक करण्याचा निर्णय स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख मागण्या काय?
1) दुधाच्या 3:2 या गुणप्रतीस लिटरला 34 रुपयांचा भाव मिळावा.
2) एसएनएफचा 20 पैसे तर फॅटचा 30 पैसे दर निश्चित करावा.
3) तेलंगणा आणि कर्नाटक राज्याच्या धर्तीवर शेतकऱ्यांना प्रती लिटर पाच रुपयांचे अनुदान देण्यात यावे.
4) पशुधनाला मोफत विमा सरंक्षण मिळावं
5) डबल टोन दुधावर बंदी आणावी
या प्रमुख मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
शासनाने 3.5/8.5 गुणप्रतीस 34 रुपये दर असा उल्लेख सोडून कोणतीही मार्गदर्शक नियमावली जारी केली नाही. त्यामुळं पुणे, सोलापूर, सातारा, अहमदनगर या जिल्ह्यातील प्रमुख सहकारी आणि खासगी दूध संघांनी आपापल्या हिशोबाने मनमानी करण्यास सुरुवात केली आहे. 3.5/8.5 गुणप्रति व्यतिरिक्त त्याखालील गुणप्रतिस किती दर द्यावा, अशी कोणतीही मार्गदर्शक नियमावली जारी नसल्यामुळं आपापल्या पद्धतीने दरामध्ये कपात करायला सुरुवात केली असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. पूर्वी 3.5 फॅटच्या खलील प्रत्येक गुणप्रतिस 50 पैसे प्रमाणे कपात होती. तसेच SNF8.5 खालील प्रत्येक गुणप्रतिस 30 पैसे प्रमाणे कपात होती. नवीन अध्यादेश आल्यानंतर या संघांनी पळवाट काढली आहे. फॅटच्या गुणप्रतिस 50 पैसे कपात तशीच ठेवली मात्र SNF 8.5च्या खालील प्रत्येक गुणप्रतिस 30 पैसे ऐवजी एक रूपायाने कपात करणेस चालू केल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं म्हटलंआहे.
महत्त्वाच्या बातम्या: