विदर्भातील वाघाचा पाचशे किलोमीटरचा प्रवास! धाराशिवच्या इतिहासात पहिल्यांदाच झाले दर्शन, नेमकं कारण काय?
Tiger News : मराठवाड्यातील धाराशिवमध्ये वाघाचे दर्शन व्हायची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान हा वाघ पाचशे किलोमीटरचा प्रवास करत यवतमाळहून धाराशिवमध्ये आल्याची माहिती आहे.
Tiger in Dharashiv : मराठवाड्यातील बालाघाटच्या डोंगर रांगातील रामलिंग अभयारण्यात वाघाचं दर्शन झालं. वनविभागाने बिबट्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले होते. त्यामध्ये वाघाची छबी कैद झाली. मराठवाड्यातील धाराशिवमध्ये वाघाचे दर्शन व्हायची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान हा वाघ पाचशे किलोमीटरचा प्रवास करत यवतमाळहून धाराशिवमध्ये आल्याची माहिती आहे. कॅमेरात कैद झालेला वाघ साधारण तीन वर्षाचा असून हा वाघ यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्याची T22 वाघिणीचा कब असल्याचं सांगितलं जात आहे.
यवतमाळ ते धाराशिव साधारणतः पाचशे किलोमीटरचा वाघाचा प्रवास
धाराशिव जिल्ह्यातील रामलिंग अभयारण्य आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी भागात या वाघाचा वावर असल्याचं दिसून आलं. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील वनविभागाच्या अधिकारी वाघाच्या शोधात आहेत. वाघाच्या पायाचे ठसे ट्रॅप कॅमेऱ्यातली चित्र यावरून वाघ कुठला दिशेने मार्गक्रमण करतोय याचा शोध घेतला जातोय. वाघ आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर असला तरी तो विदर्भातील टिपेश्वर येथून आला. यवतमाळ आणि धाराशिव याचे अंतर पाहिलं तर साधारणता पाचशे किलोमीटरचा हा प्रवास आहे. त्यामध्ये जंगलाचा भाग कमी आहे. त्यामुळे सहाजिकच प्रश्न पडतोय वाघानं हा प्रवास कसा पूर्ण केला आणि त्याचा मार्ग कसा असेल, हा प्रश्न या निमित्याने विचराला जाऊ लागला आहे.
यवतमाळचा हा वाघ धाराशिवच्या रामलिंगच्या जंगलात दाखल झाला. मात्र तिथे वातावरण त्याच्यासाठी पोषक आहे का? वनविभाग रामलिंगच्या जंगलातील या वाघाच रेस्क्यू करणार की वाघाच्या सोबतीसाठी वाघीण आणणार? हा प्रश्न होता, त्यावर वन्यजीव अधिकाऱ्यांनी सांगितलंय की, जिल्ह्यात वाघ दाखल झालाय या माहितीनं नागरिकांमध्येही भीतीच वातावरण आणि अफवा पसरल्या जातात. त्यावर नागरिकांनी एकट्याने फिरू नये, रात्री जाताना सोबत मोठा गाण्यांचा आवाज करत चालावं, अशी खबरदारी घेण्याचं वनाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. धाराशिवच्या जंगलात वाघ आढळला ही जशी सर्वसामान्यसाठी चिंतेची बातमी आहे. मात्र वन्य जीवाचा विचार केला तर ही समाधानाची गोष्ट आहे. रामलिंगच हे अभयारण्य वन्यजीवांसाठी समृद्ध आहे. याचंच हे चित्र आहे. कारण वाघ हा वन्यजीव साखळीतील शेवटचा घटक. हा वाघ आता किती दिवस या जंगलात राहणार माहित नाही, मात्र त्याच्या वास्तव्याच्या काळात मनुष्य आणि वाघ यात संघर्ष होणार नाही त्यासाठी वनविभागाने योग्य पावल उचलणे गरजेचे आहे.
धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात वाघाच्या खुणा कुठे आढळल्या?
कळंब तालुक्यातील हसेगाव इथ पहिल्यांदा ठसे आढळले. त्यानंतर भुम तालुक्यातील सुकटा इथ वाघाच्या पाऊल खुणा दिसल्या. त्यापाठोपाठ भुम तालुक्यातील पारडी, हाडोंग्री आणि हिवरा या गावात वाघ असल्याचे पुरावे मिळाले. येडशी येथील रामलिंग घाट अभयारण्यात वाघ रेस्क्यूच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. धाराशिव जिल्ह्यातून वाघ जवळच असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील ढेबरेवाडी इथ वन विभागाच्या कॅमेऱ्यात आढळला. धाराशिव, सोलापूर येथील वनविभागाची पथक तसेच वन्य जीव विभागाची पथक वाघाचा शोध घेत आहेत.
विदर्भातील वाघ चक्क पश्चिम महाराष्ट्रापर्यंत
विदर्भातील यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातील वाघ पश्चिममहाराष्ट्र पर्यंत पोहोचला असून धाराशिव जिल्ह्यातील अभयारण्यात लावलेल्या ट्रॅप कॅमेरामध्ये आढळलेला आहे. या वाघाने दीड वर्षांपूर्वी टिपेश्वर अभयारण्य सोडल्याची माहिती वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक उत्तम फड यांनी दिली. हा वाघ पैनगंगा अभयारण्य मार्गे मराठवाडा आणि नंतर पश्चिम महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील रामलिंगा अभयारण्यात शिरकाव केला आहे. टिपेश्वर अभयारण्यातील टी-22 वाघिणीपासून याचा जन्म झाला असून हा नर वाघ आहे. स्वतःचा प्रदेश स्थापित करण्यासाठी व मादीच्या शोधात तो 500 किलोमीटरचा प्रवास करीत या अभयारण्यात पोचला आहे.
टिपेश्वर ते धाराशिव जाण्याचा मार्ग
टिपेश्वर- पैनगंगा अभयारण्य-भोकर(नांदेड)- लातूर- धाराशिव- बार्शी (सोलापूर)
- मे 2023 मध्ये टिपेश्वर अभयारण्य अखेर दिसला
- जुलै-ऑगस्ट-2023 मध्ये पैनगंगा अभयारण्यत दिसला
- धारशिवमध्ये डिसेंम्बर 2024 मध्ये आढळला