Lockdown | लॉकडाऊनमुळे जागीच उभ्या असलेल्या कारना उंदरांचा धोका, खबरदारीसाठी महत्त्वाच्या टिप्स
लॉकडाऊनमुळे जवळपास दीड महिन्यापासून अनेकांनी आपल्या कारला हातही लावलेला नसेल. परंतु कारमध्ये सर्वात गंभीर समस्या उंदरांमुळे होऊ शकते. कार कशी फिट अॅण्ड फाईन ठेवू शकता, यासाठी काही टिप्स इथे वाचायला मिळतील.
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे देशभरातील लॉकडाऊन तिसऱ्यांदा वाढवण्यात आला लॉकडाऊनमुळे आपण सगळेच घरातच आहोत. लोकांचं येणं-जाणं बंद झाल्यामुळे आपली वाहनंही तशीच पडून आहेत. जवळपास दीड महिन्यापासून बहुतांश लोकांनी आपल्या कारला हातही लावलेला नाही. पण यामुळे तुमच्या कारमध्ये मोठ्या अडचणी उद्भवू शकतात. यातील सर्वात गंभीर समस्या उंदरांमुळे होऊ शकते. उंदरांमुळे तुमच्या कारचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या कारला फिट अॅण्ड फाईन ठेवू शकता.
उंदरांमुळे कारचं काय नुकसान होईल? उंदरांना काळोख आणि दमट जागा आवडते. त्यामुळे तुमच्या कारचं इंजिन हे त्यांच्यासाठी योग्य जागा असते. उंदीर या ठिकाणीच आपलं घर बनवून राहतात. परिणामी कारचं इंजिन चोक अप होतं. याशिवाय वायर कुरतडल्यानेही मोठा फटका बसू शकतो. यामुळे कारच्या इलेक्ट्रिकल सिस्टमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते.
दुसरी मोठी आणि गंभीर समस्या म्हणजे अस्वच्छता. उंदीर त्यांच्या अन्नाच्या साठ्यासाठी तुमच्या कारचा वापर करु शकतात. यामुळे सगळं अन्न इंजिनमध्ये पसरु शकतं. फक्त इंजिनच नाही तर कारच्या इंटिरिअरवरही अन्नाचे कण पडू शकतात. यामुळे तुमची कार ही अस्वच्छ जागा बनते.
उंदरांपासून सुटका कशी कराल? तुमच्या गाडीमध्ये उंदरांचा वावर आहे हे तुम्हाला इंजिनाच्या आवाजाने समजू शकतं, कारण उंदीर वायर कुरतडतात. त्यामुळे इंजिनमध्ये बिघाड होऊ शकतो. उंदरांपासून सुटका करण्यासाठी तुमची गाडी तातडीने उजेड असलेल्या ठिकाणी पार्क करा आणि बोनेट उघडा. तसंच कारजवळ उंदीर पकडण्याचा सापळा ठेवा. याशिवाय रिपेलंट वापरा. कार आणि इंजिन स्वच्छ करा. आणखी एक उत्तम उपाय म्हणजे पेस्ट कंट्रोल करा.
अशी परिस्थिती टाळण्यासाठी काय करावं? तुमच्या कारमध्ये उंदीर येऊ नये यासाठी काय करावं, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. जर तुम्ही तुमची गाडी गटाराच्या झाकणाजवळ, कचराकुंडीजवळ किंवा बंद असलेल्या उद्यानाजवळ पार्क केली असेल तर तातडीने गाडीच्या पार्किंगची जागा बदला. ज्या ठिकाणी उंदरांचा कमी वावर असेल आणि चांगला प्रकाश असेल अशा ठिकाणी कार पार्क करा. तसंच ठराविक दिवसांनी गाडीच्या पार्किंगची जागा बदला.
याशिवाय तुमची कार कायम स्वच्छ ठेवा. गाडीमध्ये खाद्यपदार्थ शक्यतो ठेवू नको. लॉकडाऊन असलं तरी काही दिवसांनी कारचं इंजिन सुरु करा. इंजिनाची वेळोवेळी तपासणी करा. थोडक्यात तुमच्या गाडीकडे दुर्लक्ष करु नका.