Polio : आज पोलिओ रविवार; पाच वर्षाच्या आतील बालकांसाठी 'दो बूंद जिंदगी के' आवश्यक
pulse polio Day : सध्या कोरोना लसीमुळे वॅक्सिनचं महत्व वाढलंय आणि सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव देखील कमी झाला असल्यानं आज पोलिओचे 'दो बूंद' आपल्या बालकांना द्यावेत असं आवाहन केलं जात आहे.
मुंबई: आज देशात आणि राज्यात पल्स पोलिओ लसीकरण दिवस (pulse polio Day) साजरा करण्यात येतोय. राज्यात जागोजागी पोलिओ लसीकरणाच्या कार्यक्रम होणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात या लसीकरणाच्या अभियानाची सुरुवात आज होईल. त्यामुळं आपल्या बालकांना आज पोलिओचा डोस द्यायला विसरु नका. कोरोनामुळं पोलिओ लसीकरणामध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र सध्या कोरोना लसीमुळे वॅक्सिनचं महत्व वाढलंय आणि सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव देखील कमी झाला असल्यानं आज पोलिओचे 'दो बूंद' आपल्या बालकांना द्यावेत असं आवाहन केलं जात आहे.
पल्स पोलिओ लसीकरण दिवसाच्या निमित्ताने राज्यातील पाच वर्षाच्या आतील कोणतेही बालक या लसीकरणाच्या अभियानापासून वंचित राहू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. आजचा दिवस 'पोलिओ रविवार' किंवा 'पल्स पोलिओ दिवस' म्हणूनही ओळखला जातो.
भारतात पोलिओ लसीकरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाच वर्षाखालील कमी वयाच्या बालकांमध्ये हे लसीकरण करण्यात येतं. या कार्यक्रमात लाखो स्वयंसेवक, निरीक्षक आणि इतर काही कर्मचारी भाग घेतात. पोलिओ लसीकरण मोहीम वर्षातून दोनदा घेतली जाते आणि सहसा सुरुवातीच्या काही महिन्यांत सुरू केली जाते. सध्या कोविड 19 साथीच्या आजारात लसीकरण मोहीम राबविली जात आहे.
भारतात 1995 सालापासून पल्स पोलिओच्या कार्यक्रमाची सुरुवात
जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने भारतात 1995 सालापासून पल्स पोलिओच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. देशातले एकही बालक पोलिओच्या लसीपासून वंचित राहू नये यासाठी सर्व सार्वजनिक ठिकाणी, बस स्थानके, रेल्वे स्टेशन आणि इतर अनेक पर्यटन स्थळांवर पोलिओची मोफत लस दिली जाते. 2014 साली भारत हा पोलिओमुक्त झाल्याचं प्रशस्तीपत्र जागतिक आरोग्य संघटनेनं दिलं होतं. पण असं असलं तरी देशात अजूनही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिओ लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येतोय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )