Dengue in Child : सावधान! लहान मुलांमध्येही वेगाने पसरतोय डेंग्यु; तुमच्याही मुलाला लागण झाल्यास 'असं' संरक्षण करा
Dengue in Child : डेंग्यूचा संसर्ग लहान मुलांनाही होत आहे. डेंग्यूने बाधित असणाऱ्या मुलांना 102 ते 104 अंश सेल्सिअसपर्यंत ताप येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
Dengue in Child : भारतात सध्या डेंग्यू (Dengue) तापाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. डेंग्यू हा गंभीर आजार असल्याने आणि त्यावर उपचार (Treatment) न केल्यास प्राणघातक ठरू शकतो, त्यामुळे त्याची लक्षणे अचूक ओळखणे महत्त्वाचे आहे. या तापामध्ये प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात. दररोज मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या अनेक केसेस समोर येत आहेत. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक राज्य सरकारदेखील ठोस पावले उचलत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डेंग्यूची लागण लहान मुलांनाही होत आहे. डेंग्यूने बाधित मुलांना (Children) 102 ते 104 अंश सेल्सिअसपर्यंत ताप येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा टाळावा. लहान मुलांमध्ये डेंग्यूची लक्षणे, प्रतिबंध आणि उपचार याबद्दल जाणून घेऊयात.
मुलांमध्ये 'ही' डेंग्यूची लक्षणे दिसल्यास सावध व्हा
- उच्च ताप येणे
- जास्त उलट्या होणे
- शरीरावर पुरळ तयार होणे
- नाक आणि हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणे
- डोकेदुखी आणि शरीर दुखणे
डेंग्यूपासून मुलांचे संरक्षण कसे करावे?
1. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलांना सतत 5 दिवस ताप येत असेल तर त्यांना डॉक्टरांकडे न्या.
2. तुम्ही जिथे राहता त्या परिसराची स्वच्छता ठेवा.
3. दररोज पाण्याने भांडी आणि टाक्या स्वच्छ करत रहा.
4. कूलरमधील पाणी सतत बदलत राहा.
5. मुलांना सकाळी आणि संध्याकाळी घराबाहेर पडू देऊ नका.
6. जर मुलांचे शरीर खूप थंड होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डेंग्यूबद्दल डॉक्टर काय म्हणतात?
डेंग्यूमुळे (Dengue) शरीरात द्रवपदार्थाचा असंतुलन होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हे धोकादायक पातळीवर घेऊन जाते. यामुळे कमी रक्तदाब आणि पोटदुखी होऊ शकते. लहान मुलांमध्ये अशी लक्षणे दिसल्यास वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.
डेंग्यूवर प्रतिबंधात्मक उपाय काय?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, डेंग्यूची दुसरी लागण टाळायची असेल, तर प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला पाहिजे. डासांच्या अळ्यांना जन्म घेण्यापासून रोखण्यासाठी, घाण पाणी साचू देऊ नका. जेथे पाणी साचते तेथे कीटकनाशकाची फवारणी करत रहा. डेंग्यूच्या डासांच्या चावण्यापासून स्वतःचे संरक्षण करत रहा. शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्याकडे लक्ष द्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )