Suresh Dhas : धनंजय मुंडेंनी पोसलेल्या गिधाडांनी आमचा माणूस मारला, मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबतही सुरेश धसांचं महत्त्वाचं वक्तव्य
Suresh Dhas on Santosh Deshmukh Case : धनंजय मुंडेंनी पोसलेल्या गिधाडांनी आमचा माणूस मारलाय, असा हल्लाबोल सुरेश धस यांनी संतोष देशमुख प्रकरणावरून केलाय.

Suresh Dhas on Santosh Deshmukh Case : धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) पोसलेल्या गिधाडांनी आमचा माणूस मारलाय. संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांना बेक्कार पद्धतीने संपवण्यात आले, असा हल्लाबोल भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलाय. तसेच धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबतही सुरेश धसांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय.
नाशिक येथे एबीपी माझाशी बोलताना सुरेश धस म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी स्वतः असले लोक का पोसले? तुम्हीच म्हणत होते ना आका आमच्या फार जवळचे आहेत. कालपर्यंत जवळ होता आणि आज कसा लांब झाला तो? वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते आता फोन वगैरे मध्ये सापडले नसतील, नाहीतर हे कोणाच्या आशीर्वादाने मोठे झाले आहेत. तुम्ही किमान खंडणीत सामील आहात की नाही हे तरी लोकांना सांगा, असे आव्हान त्यांनी धनंजय मुंडे यांना दिले आहे. मी आधी आरोप केला आहे की खंडणी मागायला ते लोक सातपुडा बंगल्यावर गेलेले आहेत, त्या आरोपाचे धनंजय मुंडे यांनी खंडन करावे, असेही सुरेश धस यांनी म्हटले आहे.
पंकजा मुंडेंचा सत्कार करणार नाही
पंकजा मुंडे यांचा देखील या प्रकरणात काही संबंध आहे का? असे विचारले असता, सुरेश धस म्हणाले की, पंकजा मुंडे यांचा या गोष्टीत काहीच संबंध नाही. त्यामुळे त्यांचे नाव कशाला घ्यायचे? त्यांचे आणि आमचे राजकीय भांडण आहे. ते आम्ही वेगळ्या व्यासपीठावर भांडू. प्रशासकीय कार्यक्रमात आमच्या येथे त्या आल्या होत्या तेव्हा आम्ही त्यांचा सत्कार केला. शासकीय कार्यक्रम सोडून आम्ही पंकजा मुंडे यांचा सत्कार करणार नाही. तो आमचा पक्षांतर्गत विषय आहे, असे त्यांनी म्हटले.
धनंजय मुंडेंनी पोसलेल्या गिधाडांनी आमचा माणूस मारला
सुरेश धस पुढे म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी पोसलेली जी गिधाड आहेत. या गिधाडांनी आमचा माणूस मारला. संतोष देशमुख यांनी बेक्कार पद्धतीने संपवले. परळीत इतके मर्डर झाले आहेत की, त्याची एक यादीच द्यावी लागेल, असे त्यांनी म्हटले. परळीतच का मर्डर होतात? परळीचे लोक गाव सोडून दुसऱ्या गावाला का निघून जातात? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
धनंजय मुंडेंनी एकटे परळीत जावे
तुम्ही लोकप्रतिनिधी आहात कधीतरी जा त्या परळी गावात एकटे जा, असे आव्हान सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना दिले. आम्ही तर आमच्या मतदारसंघात एकटेच फिरतो आम्हाला कोणाची गरज नाही, असेही त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तुमची काय मागणी आहे? याबाबत विचारले असता आमची मागणे एकच आहे की, हे सगळे फासावर जावे, असे सुरेश धस यांनी म्हटले.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सुरेश धसांचं महत्त्वाचं वक्तव्य
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता सुरेश धस म्हणाले की, त्यांच्या पक्षाचे आमदार, मोर्चेकरी आणि सगळ्याच लोकांची राजीनाम्याची मागणी आहे. आता त्यांचा राजीनामा घ्यायचा की नाही? हे अजित दादा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या हातात आहे. ते भाजपच्या हातात नाही. धनंजय मुंडे यांनी वर्षभर थोडंसं बाजूला व्हायला हवं. तुमच्या पदावर राहण्यामुळे तपासावर परिणाम होणार आहे. म्हणून त्यांनी एक वर्ष बाजूला राहावे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

