SBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीचं स्वप्न पूर्ण होणार, वर्षभरात 10 हजार जागांची भरती, बँक 600 नव्या शाखा उघडणार
SBI Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये येत्या वर्षभरात 10 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. नव्यानं शाखा देखील उघडल्या जाणार आहेत.
नवी दिल्ली : बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं नव्यानं 10 हजार जागांवर भरती करणार असल्याची घोषणा केली आहे. येत्या वर्षभरात 10 हजार जागांवर मनुष्यबळाची भरती करण्यात येणार आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळं बँकिंग क्षेत्रातील भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी आतापासून तयारी सुरु करणं आवश्यक आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन सी एस शेट्टी यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भातील माहिती दिली. बँकेनं ग्राहक सेवा आणि तांत्रिक प्रक्रियांमध्ये सुधारणा करण्यासाठी नव्यानं 10 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे.
मनुष्यबळ वाढवण्यासाठी आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत सुधारणा आणि सामान्य बँकिंग सेवा बळकट करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियानं तंत्रज्ञान क्षेत्रातील 1500 जणांची भरती प्राथमिक आणि उच्च पातळीवरील पदांवर करण्याची घोषणा केल्याचं सी एस शेट्टी यांनी म्हटलं. सी एस शेट्टी यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील पद डाटा सायन्टिस्ट, डाटा आर्किटेक्ट, नेटवर्क ऑपरेटर पदं भरली जाणार आहेत. या वर्षात आम्ही 8 ते 10 हजार पदांची भरती करणार आहोत. तंत्रज्ञान आणि सामान्य बँकिंग सेवा या दोन्ही विभागात भरती केली जाणार आहे.
मार्च 2024 च्या आकडेवारीनुसार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचारी संख्या 2,32,296 इतकी आहे. यापैकी 1,10,116 पदं अधिकाऱ्यांची आहेत. तर, 85 हजार पदांवर बिझनेस कॉरस्पॉंडट आहेत.
स्टेट बँक 600 शाखा उघडणार
स्टेट बँक ऑफ इंडियानं देशभरातील बँकिंग सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आगामी काळात देशभरात 600 शाखा उभारल्या जाणार आहेत. एसबीआयच्या देशभरात 22,542 जागा आहेत. सी एस शेट्टी यांनी शाखांच्या विस्तारांची योजना असून जवळपास 600 शाखा वाढवण्याचं नियोजन असल्याचं ते म्हणाले.
स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. देशभरात बँकेच्या 22,542 शाखा आहेत. याशिवाय 65 हजार एटीएम देखील आहेत. सीएस शेट्टी यांनी देशभरातील 50 हजार ग्राहकांना आम्ही सेवा पुरवत असल्याचं म्हटलं.
स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करायची असल्यास उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाईटला नियमितपणे भेट द्यावी. एसबीआयच्या वेबसाईटवर करिअर्स या लिंकवर सध्या सुरु असलेल्या भरती प्रक्रियेबाबत माहिती मिळते. एसबीआयनं बँकेत नोकरी करणाऱ्या उमेदवारांना खोट्या किंवा फसवणूक करणाऱ्या भरतीच्या जाहिरातींपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे.
इतर बातम्या :