NABARD Recruitment : नाबार्डमध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारांची भरती, 35 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार, अर्ज कुठे करायचा?
NABARD Recruitment : नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्डमध्ये 108 जागांवर भरती प्रक्रिया सुरु आहे.
मुंबई : सरकारी नोकरीची प्रतीक्षा असणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. कृषी आणि ग्रामीण विकासासाठी कार्यरत असलेल्या नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट मध्ये 108 पदांची भरती होणार आहे. नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ही बँक नाबार्ड म्हणून देखील ओळखली जाते. या बँकेकडून शेती क्षेत्राला वित्त पुरवठा केला जातो. यासह ग्रामीण भागात पायाभूत सोयी सुविधांच्या निर्मितीसाठी देखील नाबार्ड मदत करत असते. या बँकेत कार्यालयीन सहायक या पदावर 108 उमेदवारांची भरती केली जाणार आहे. या पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून पात्र उमेदवार नाबार्डची मूळ जाहिरात वाचून अर्ज सादर करु शकतात.
नाबार्डमध्ये कोणत्या पदाची भरती, किती पगार मिळणार?
नाबार्डनं कार्यालयीन सहायक पदाच्या 108 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवारांना याद्वारे अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कार्यालयीन सहायक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं शिक्षण दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 18 ते 30 वर्षांदरम्यान ज्यांचं वय असेल ते उमेदवार अर्ज दाखल करु शकतात. नाबार्डनं जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 35 हजार रुपयांपर्यंत वेतन दिलं जाणार आहे.
अर्ज कधीपासून करायचा?
नाबार्डमधील कार्यालयीन सहायक या पदासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करावे लागणार आहेत. नाबार्डच्या अधिकृत वेबसाईटवर या पदासाठी 2 ऑक्टोबरपासून 21 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील. नाबार्डकडून देशातील विविध राज्यातील कार्यालयातील रिक्त असलेल्या कार्यालयीन सहायक या पदासाठी अर्ज मागवले आहेत. ही भरती प्रक्रिया एकूण 108 पदांसाठी राबवली जात असली तरी सर्वाधिक जागा महाराष्ट्रातून भरल्या जाणार आहेत. यामध्ये काही जागा अनुशेषाच्या देखील असतील. याशिवाय मुंबईतील मुख्यालयातील जागा देखील याभरतीद्वारे भरल्या जाणार आहेत.
नाबार्डकडून भरल्या जाणाऱ्या 108 जागांमध्ये 54 जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 4, अनूसुचित जमातीसाठी 12, ओबीसीसाठी 28 आणि ईडब्ल्यूएससाठी 10 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये काही जागा या माजी सैनिक आणि दिव्यांगासाठी देखील राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
खुल्या आणि ओबीसी प्रवर्गासाठी 450 रुपये शुल्क असून 50 रुपये इतर शुल्क असं एकूण 500 रुपये शुल्क भरावं लागेल. तर, अनूसुचित जाती, अनूसुचित जमाती, दिव्यांग आणि माजी सैनिक उमेदवारांना केवळ 50 रुपये शुल्क भरावं लागणार आहे.
इतर बातम्या :