हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव हिच्या नावावर बार्शी तालुक्यात 35 एकर जागा असल्याचे उघड झाले होते.
सोलापूर : बीडमधील खंडणी व सरपंच हत्याप्रकरणामुळे सध्या चर्चेत आणि अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराडविरुद्ध पोलीस कारवाईला वेग आला आहे. त्यातच, त्याच्या संपत्तीचे आणि पोलिसांशी असलेल्या संबंधाचे दररोज नवनवीन प्रकरणे बाहेर येत आहेत. काही दिवसांपूर्वी त्याच्या दुसऱ्या पत्नीची शेती बार्शी तालुक्यातील गावात असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर, आज वाल्मिक कराडची (Walmik karad) आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून पोलिसांवर दबाव टाकताना आपण इथं बाप बसलोय, असे तो म्हणत आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच, ज्या शेतकऱ्यांकडून (farmers) हार्वेस्टरसाठी वाल्मिक कराडने पैस उकळले त्या शेतकऱ्यांनी आता वाल्मिक कराडच्या पत्नीच्या जमिनीचा ताबा घेण्याची भूमिका घेतली आहे.
ऊसतोडणी करणाऱ्या हार्वेस्टरला अनुदान मिळवून देतो असे सांगून शेतकऱ्यांना 11 कोटी 20 लाख रुपयांची टोपी घालणाऱ्या वाल्मिक कराडने पैसे परत न दिल्यास त्याच्या दुसऱ्या बायकोच्या नावावर असलेल्या बार्शी येथील जमिनीचा ताबा घेऊ असा इशारा जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांनी दिला आहे. राज्यातील जवळपास 145 शेतकऱ्यांना अनुदान देतो म्हणून प्रत्येकी आठ लाख रुपये कराडच्या माणसाकडून गोळा करण्यात आले होते. मात्र, अनुदानच न मिळाल्याने जेव्हा हे शेतकरी आपले पैसे परत मागायला गेले तेव्हा त्यांना धमकावल्याने ते घाबरून परत फिरले होते. यानंतर या शेतकऱ्यांनी पोलिसात धाव घेत तक्रारी अर्जही दिले मात्र अजूनही याबाबत कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेच्या नेत्याने आता वाल्मीक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर असणारी बार्शी तालुक्यातील शेंद्री येथील जमीन ताब्यात घेणार असल्याचे सांगितले.
वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव हिच्या नावावर बार्शी तालुक्यात 35 एकर जागा असल्याचे उघड झाले होते. आता या सर्व हार्वेस्टर मालकांची मीटिंग करमाळा येथे होणार असून यामध्ये पहिल्यांदा बार्शीची शेतजमीन ताब्यात घ्यायची आणि त्यानंतरही पैसे पूर्ण न झाल्यास पुण्यातील कराडची प्रॉपर्टी ताब्यात घेऊ असा इशारा अतुल खूपसे यांनी दिला आहे. पुढील. सात दिवसाच्या आत शासनाने कराडची संपत्ती ताब्यात घेऊन हार्वेस्टर मालकांचे पैसे द्यावेत, अन्यथा बार्शी तालुक्यातील दुसऱ्या पत्नी ज्योती जाधव हिच्या नावावर असलेली शेतजमीन ताब्यात घेणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यावर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही वेळप्रसंगी पुणे आणि बीड येथील संपत्तीवर हार्वेस्टर मालकासहित ताबा घेणार असल्याचा इशाराही खूपसे पाटील यांनी दिला आहे.
हेही वाचा
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार