Public Sector Banks: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी दरवाजे उघडले, युवकांना प्रशिक्षण देणार, 15 हजार मानधन रुपये मिळणार
Apprenticeship Programme : यूनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि इंडियन ओवरसीज बँकेने अप्रेंटिसशिप योजना सुरु केली आहे. तर, बँक ऑफ इंडियाला यासंदर्भातील मंजुरी मिळाली आहे.
Apprenticeship Programmes नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मोठा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी अप्रेंटसशिप प्रोग्रामद्वारे युवकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आगामी काळात अप्रेंटिसशिप प्रोग्रामद्वारे युवकांची छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात नियुक्ती केली जाईल. प्रशिक्षण कार्यक्रमातून उपलब्ध होणाऱ्या कर्मचाऱ्यांना बँकांच्या योजना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणं ग्राहकांपर्यंत पोहोचवाव्या लागतील. गेल्या काही वर्षांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळं सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना अप्रेंटिस योजनेतून मिळणारं मनुष्यबळ फायदेशीर ठरणार आहे.
कोणत्या बँकांना परवानगी मिळाली?
यूनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India), कॅनरा बँक (Canara Bank) आणि इंडियन ओवरसीज बँक (Indian Overseas Bank) या बँका अप्रेंटिसशिप प्रोग्रामद्वारे युवकांची नियुक्ती करु शकतात. यूनियन बँक ऑफ इंडिया 500, कॅनरा बँक 3000 आणि इंडियन ओवरसी बँकेनं 550 पदवीधरांना नियुक्ती देण्याबाबत प्रक्रिया सुरु केली आहे. एका वर्षाच्या कालवधीच्या अप्रेंटिसशिप कार्यक्रमासाठी युवकांना 15 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बँक ऑफ इंडियाच्या बोर्डानं देखील अप्रेंटिसशिप कार्यक्रम सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. या बँकेत साधारणपणे 1300 लोकांची नियुक्ती केली जाईल. अप्रेंटिसशिपद्वारे नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कस्टमर रिलेशनचं काम दिलं जाईल. कॅनरा बँकेचे एमडी आणि सीईओ सत्यनारायण राजू यांच्या माहितीनुसार अप्रेंटिसशिप मधील उमेदवारांना वेगवेगळ्या क्षेत्रात नियुक्त केलं जाईल. याद्वारे लोकांपर्यंत वित्तीय सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. बँकिंग क्षेत्रात काम केल्यानं वित्तीय क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.
दरम्यान, अप्रेंटिसशिप कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर संबंधित तरुणांना बँकेत नोकरी मिळण्याची शक्यता नाही. मात्र, बँकांना या योजनेद्वारे फायदा होणार आहे. बँकेचे कर्मचारी ज्या ठिकाणी कमी असतील तिथं प्रशिक्षणार्थींची नियुक्ती केली जाईल. ज्येष्ठ नागरिकांना सेवा पोहोचवण्यामध्ये यांची भूमिका महत्त्वाची आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होईल. त्यामुळं कर्ज वसुली, कागदपत्र पडताळणी आणि कर्ज वितरणासंदर्भातील कामं सोपवली जातील.
इतर बातम्या :