Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासावर झिशान सिद्दीकी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. आता आपल्याही जीवाला धोका असल्याचा दावा त्यांनी केला.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणी आपल्या जबाबात ज्यांची नावं घेतली होती त्यांची अद्याप चौकशी केली जात नाही असं म्हणत माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी तपासावर नाराजी व्यक्त केली. आता आपल्याही जीवाला धोका आहे. आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला जर काही झालं तर त्याला जबाबात नावं घेतलेले सर्व बिल्डर्स जबाबदार असतील असंही झिशान सिद्दीकी म्हणाले.
झिशान सिद्दीकी म्हणाले की, "माझ्या वडिलांच्या खून प्रकरणात ज्या पद्धतीने तपास सुरू आहे त्याबद्दल मी खूप नाराज आहे. चार्जशिट मी वाचली आहे. तपास अधिकाऱ्यांसमोर मी जी नावे घेतली आहेत त्यांची कोणतीही चौकशी अद्याप केली जात नाही. त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे."
आता माझ्या जीवालाही धोका आहे. जर माझ्या कुटुंबाला किंवा मला काही झाले तर सर्व बिल्डर्स आणि माझ्या जबाबात मी घेतलेली इतर नावे त्यासाठी जबाबदार असतील.
... तर कायदा आणि सुव्यवस्था विनोद बनेल
झिशान सिद्दीकी म्हणाले की, "मी सरकारचा सेवक आहे पण मी आता आमदार नाही. मी फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा एक कार्यकर्ता आहे. मी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून माझी चिंता व्यक्त करणार आहे. माझ्या जबाबानंतरही जर या सर्वांची चौकशी झाली नाही तर कायदा आणि सुव्यवस्था हा विनोद बनला आहे असं म्हणेन."
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आता माजी आमदार झिशान सिद्दीकींचा जबाब चर्चेत आला आहे. झिशान सिद्दीकींनी 2 नेते आणि 7 विकासकांची नावं आपल्या जबाबात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
झिशान सिद्दिकी यांनी जबाबात काय म्हटलं?
वडिलांच्या हत्येनंतर पोलिसांना दिलेल्या जबाबात झिशान सिद्दीकी यांनी सांगितलं की, "12 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी 5:30 वाजता मी घराबाहेर पडलो आणि संध्याकाळी 6:00 वाजता वांद्रे पूर्व येथील माझ्या ऑफिसमध्ये पोहोचलो, जिथे मी कार्यकर्त्यांसोबत माझ्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाबद्दल चर्चा करत होतो.
संध्याकाळी 7:00 वाजता माझे वडील बाबा सिद्दीकी माझ्या ऑफिसमध्ये पोहोचले, मी त्यांच्याशी दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाबद्दल चर्चा केली, त्यानंतर मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो, माझे वडील अँटी चेंबरमध्ये होते, जिथे त्यांनी इतर कामगारांशी बोलायला सुरुवात केली. रात्री 9:00 च्या सुमारास मला भूक लागली आणि मग मी माझे वडील बाबा सिद्दीकी यांना याबद्दल माहिती देण्यासाठी अँटी पेमेंट ऑफिसमध्ये गेलो पण ते तिथे नमाज पढत होते, म्हणून मी बाहेर आलो आणि काही वेळ माझ्या केबिनमध्ये बसलो. नंतर मी अँटी पेमेंट ऑफिसमध्ये गेलो. पुन्हा चेंबरमध्ये गेलो आणि विचारलं की, काही काम आहे का? नाहीतर मी जातो आणि 10 ते 15 मिनिटांत परत येतो.
यानंतर, मी दानियल आणि आझम रिझवी यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील संजय हॉटेलमध्ये गेलो, जे कार्यालयापासून थोड्या अंतरावर आहे. तिथे मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलत होतो. काही वेळानं दानियलला त्याच्या मोबाईलवर एक कॉल आला आणि तो मोठ्यानं ओरडला, "फायरिंग हुई है" त्यावेळी त्याला विचारलं कुणावर फायरिंग होत आहे, तो म्हणाला की, "बाबा भाईपर फायरिंग हुई है..."
त्यानंतर, मी ताबडतोब माझ्या ऑफिसकडे पायी धावू लागलो. त्यावेळी माझ्यासोबत सिक्युरिटीसाठी असलेल्या पोलिसांनी मला त्यांच्या गाडीत बसवलं आणि नंतर आम्हाला कळलं की, वडिलांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं आहे, मग आम्ही थेट लीलावती हॉस्पिटलकडे निघालो.
गाडीत बसूनच मी माझ्या कार्यकर्त्यांशी फोनवर बोललो की, माझे वडील वाचतील ना? त्यावर कार्यकर्ता म्हणाला की, माझ्या वडिलांच्या शरीरातून खूप रक्त गेलंय. मी लीलावती रुग्णालयात पोहोचताच माझ्या आईला, बहिणींना याबाबत सांगितलं. त्यांना रुग्णालयात बोलावून घेतलं.
Before You Go
Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!






















