Will Smith, Chris Rock : ‘थप्पड’ प्रकरणाचा विल स्मिथला बसलाय मानसिक धक्का, अभिनेता घेतोय थेरपीची मदत!
Will Smith : अभिनेता विल स्मिथ सध्या यातून बाहेर पडण्यासाठी थेरपीचा आधार घेत असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

Will Smith : ‘ऑस्कर 2022’च्या सोहळ्यापासून अभिनेता विल स्मिथ (Will Smith) सतत चर्चेत आहे. ‘किंग रिचर्ड’साठी अकादमी पुरस्कारांमध्ये विलचा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून झालेला सन्मान ख्रिस रॉकला (Chris Rock) लगावलेल्या एका थप्पडमुळे झाकोळून गेला. या थप्पड प्रकरणानंतर अभिनेत्याने एक निवेदन जारी करून अकादमीची माफी देखील मागितली होती. या प्रकरणी कारवाई म्हणून अकादमी संस्थेने विलवर 10 वर्षांसाठी बंदी घातली आहे. सध्या लाईमलाईटपासून दूर असलेल्या विलला या प्रकरणाचा मानसिक त्रास होत असल्याचे बोलले जात आहे.
अभिनेता विल स्मिथ सध्या यातून बाहेर पडण्यासाठी थेरपीचा आधार घेत असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. ऑस्करच्या घटनेनंतर थेरपीसाठी जात आहे, असे विलच्या एका जवळील व्यक्तीने सांगितले आहे. विल आणि त्याच्या कुटुंबाने अद्याप या अहवालांवर प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, हे प्रकरण विलसाठी खूपच त्रासदायक ठरलं आहे.
थप्पड प्रकरणानंतर अभिनेता विल स्मिथ भारतात देखील आला होता. इथे त्याने देवदर्शन करून, काही काळ मनःशांतीच्या शोधात घालवला. अभिनेता 23 एप्रिल रोजी मुंबई विमानतळावर स्पॉट झाला होता. यावेळी त्याने आपल्या चाहत्यांशी संवाद देखील साधला होता.
विलच्या वैवाहिक जीवनातही बेबनाव
पत्नी जाडा पिंकेट-स्मिथ (Jada Pinkett-Smith) हिच्या आजारपणाची खिल्ली उडवल्याने संतापलेल्या विल स्मिथने होस्ट ख्रिस रॉकला जोरदार थप्पड लगावली होती. मात्र, आता या थप्पडचा परिणाम अभिनेत्याच्या वैवाहिक जीवनावरही दिसायला लागला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ज्या पत्नीसाठी विलने होस्टच्या कानाखाली लगावली, तीच आता विलची साथ सोडण्याच्या तयारीत आहे. ऑस्कर थप्पड प्रकरणानंतर जाडा आणि विल यांच्या नात्यात देखील काही गोष्टी बिनसल्या आहेत. दोघेही एकमेकांसोबत जास्त बोलत नसल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले आहे. आता दोघांमधील तक्रारी इतक्या वाढल्या आहेत की, ही जोडी घटस्फोट घेण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, यावर दोघांकडूनही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
हेही वाचा :























