(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हौशी नाट्यसंस्थांना नाट्यपरिषद मदत करणार, प्रसाद कांबळी यांची माहिती
प्राथमिक फेरीत राज्यभरातून जवळपास 400 पेक्षा जास्त संस्था सहभागी झाल्याचा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. सर्व संबंधित संस्थांनी नाट्यपरिषदेशी संपर्क साधावा असं आवाहनही यावेळी करण्यात आलं.
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात अनेक नाट्यकर्मींना, नाट्यसंस्थांना मोठा आर्थिक फटका बसला. सरकारची तिजोरीही कोविडशी संबंधित अनेक योजनांवर रिकामी झाली. त्यामुळे सांस्कृतिक योजनांवर मात्र गदा आली. यातला मोठा फटका राज्यभर असलेल्या हौशी नाट्यसंस्थांना बसला. याच हौशी नाट्यसंस्थांच्या मदतीला आता नाट्यपरिषद धावून येणार आहे. कार्यकारिणी बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती प्रसाद कांबळी यांनी दिली.
दरवर्षी प्रमाणे 2019 मध्येही राज्य नाट्यस्पर्धांना सुरूवात झाली. गेल्या वर्षी त्याची प्राथमिक फेरी पार पडली. तर यावर्षी लॉकडाऊन आधी अंतिम फेरीही पार पडली. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ अद्याप झालेला नाही. तर या स्पर्धेत भाग घेणाऱ्या संस्थांना राज्य सरकार प्रवास भत्ता देतं. तो भत्ताही दिला गेला नाही. स्पर्धेसाठी संबंधित संस्था पदरचे पैसे खर्च करून प्रयोगस्थळी येते आणि प्रयोग करते. त्या प्रवासाचे पुरावे दिल्यानंतर राज्य सरकारतर्फे हा प्रवास खर्च संबंधित संस्थेला दिला जातो. पण हे वर्षं त्याला अपवाद ठरलं. कारण सरकारी तिजोरीत पैसे नव्हते. त्याची दखल नाट्यपरिषदेने घेतली आहे.
ज्या हौशी नाट्यसंस्थांनी 2019 मध्ये राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सहभाग घेतला त्यांना नाट्यपरिषदेने मदत करायचं ठरवलं आहे. नाट्यपरिषदेच्या इमेलवर संबंधित संस्थांनी इमेल करून सहभाग घेतल्याचा एखादा पुरावा द्यायचा आहे. त्यानंतर परिषद ही मदत करणार आहे. ही मदत किती असेल ते अद्याप कळलेलं नाही. पण फुल ना फुलाची पाकळी म्हणून ही मदत करण्याचा ठराव कार्यकारिणीच्या बैठकीत झाला आहे अशी माहीती नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी दिली.
प्राथमिक फेरीत राज्यभरातून जवळपास 400 पेक्षा जास्त संस्था सहभागी झाल्याचा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. सर्व संबंधित संस्थांनी नाट्यपरिषदेशी संपर्क साधावा असं आवाहनही यावेळी करण्यात आलं.
यशवंत नाट्यसंकुलाचा पुन:निर्माण करण्याचा संकल्प
कार्यकारिणीच्या बैठकीत माटुंग्यात असलेल्या यशवंत नाट्यसंकुलाची पुन:निर्माण करण्याचा संकल्प सर्व कार्यकारिणीने एकमताने सोडल्याची माहीती कांबळी यांनी दिली. ते म्हणाले, 'यशवंत नाट्यसंकुलाच्या जागेवर आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं थिएटर बांधण्याचा संकल्प आहे.. यात उत्तम रंगमंच असेल. शिवाय, व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगकर्मींसाठी सुसज्ज थिएटर असेल. शिवाय, ब्लॅक बॉक्स असेल. आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा देण्याचा संकल्प आम्ही सोडला आहे. अभिनेते आणि नेपथ्यकार राजन भिसे यासाठी विशेष मार्गदर्शन करणार आहेत. '