Marathi Natak : 'धनंजय माने इथंच राहतात' लवकरच रंगभूमीवर
'धनंजय माने इथंच राहतात' हे विनोदी मराठी नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Marathi Natak : मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेला सिनेमा म्हणजे 'अशी ही बनवा बनवी' (Ashi hi banwa banwi). सिनेमा कितीही वेळा पाहिला तरी पोट धरून हसायला भाग पाडतो. सिनेमातील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या सिनेमातील लक्ष्मीकांत बेर्डेंचा 'धनंजय माने इथेच राहतात का?' हा संवाद प्रचंड गाजला होता. या गाजलेल्या संवादावर आधारित 'धनंजय माने इथंच राहतात' हे नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे.
'धनंजय माने इथंच राहतात' या नाटकाची विशेष बाब म्हणजे या नाटकात प्रिया बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे मुख्य भूमिकेत असणार आहेत. तसेच प्रिया बेर्डे या नाटकाची निर्मिती करत आहेत. या नाटकाचे लेखन नितीन चव्हानने केले आहे. तर दिग्दर्शनाची धुरा राजेश देशपांडेंनी सांभाळली आहे. नाटकाला अमीर हडकरचे संगीत लाभले आहे. तर संदेश बेंद्रेने नाटकाचे नेपथ्य केले आहे.
नाटकात स्वानंदी बेर्डे आणि प्रिया बेर्डेसह निमिश कुलकर्णी, मृगा बोडस, नीलय घैसास, चेतन चावडा आणि प्रभाकर मोरेंच्या विशेष भूमिका आहेत.
स्वानंदी बेर्डेचं रंगभूमीवर पदार्पण
लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेते म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आपल्या जबरदस्त विनोदी शैलीच्या जोरावर तब्बल तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत आता त्यांची मुलगी स्वानंदी बेर्डे अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आहे. स्वानंदीचं हे नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
'अशी ही बनवा बनवी' सिनेमातील 'आमच्या शेजारी राहते. नवऱ्याने टाकलंय तिला', 'सारखं सारखं एकाच झाडावर काय', 'सत्तर रुपये वारले', 'धनंजय माने इथेच राहतात का?' असे अनेक संवाद तुफान गाजले होते. आजदेखील अनेकांच्या जीभेवर हे संवाद रेंगाळत असतात.
संबंधित बातम्या