The Entrepreneur-A Documentary: तुळजापूरमधील तरुणाची उत्तुंग भरारी, झाला लंडनमधील उद्योजक; प्रतीक शेलारची कहाणी पाहता येणार यूट्यूबवर
प्रतीक शेलार (Pratik Shelar) या तरुणाची 'द आंत्रप्रेन्युअर' (The Entrepreneur - A Documentary) ही डॉक्युमेंट्री आता यूट्यूबवर नेटकऱ्यांना पाहता येणार आहे.
The Entrepreneur-A Documentary: अविश्वसनीय धाडसामुळे आणि जिद्दीमुळे अशक्य वाटणाऱ्या आव्हानांना सामोरे जात, यश संपादन करणे, ही काल्पनिक वाटणारी कथा आपल्याला खऱ्या आयुष्यातही कधीतरी ऐकायला मिळते. प्रतीक शेलार (Pratik Shelar) या तरुणाची 'द आंत्रप्रेन्युअर' (The Entrepreneur - A Documentary) ही डॉक्युमेंट्री आता यूट्यूबवर नेटकऱ्यांना पाहता येणार आहे. तुळजापूरमधील एका छोट्या गावातील मुलगा ते लंडनमधील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा एक भारतीय उद्योजग, असा प्रतीक शेलारचा यशस्वी प्रवास आहे. हा प्रवास त्यांच्यासाठी नक्कीच सोप्पा नव्हता. त्यांचा हा संघर्षमयी प्रवास आपल्याला 'द आंत्रप्रेन्युअर' या माहितीपटात पाहायला मिळणार आहे. प्रतीकने भारतातील एका छोट्या शहरात सामान्य जीवन जगताना विलक्षण यश मिळविण्याचे स्वप्न कसे पाहिले आणि या एका स्वप्नाने त्याला यश आणि आत्म-शोधाच्या मार्गावर कसे नेले, याची कथा कथन केली आहे. युट्युबवर सात भागांत उपलब्ध असलेला हा प्रवास प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहे.
महाराष्ट्रातील तुळजापूर या शहरात 1988 साली जन्मलेल्या प्रतीकला लहानपणापासूनच मनोरंजन क्षेत्राची, चित्रपटांची आवड होती. त्याची ही आवड एक उद्योजक म्हणून त्यांच्या भविष्याचा मार्ग मोकळा करेल, हे त्याच्या पालकांच्या ध्यानीमनीही नव्हते. एका सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेल्या प्रतीकचे वडील प्रवीण नानासाहेब शेलार हे तुळजापूर आणि उस्मानाबाद नगरपरिषदमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होते. प्रतीकच्या वडिलांची इच्छा होती की, त्यांनी आयआयटीमधून पदवीधर व्हावे आणि यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन कलेक्टर व्हावे. परंतु, प्रतीकची यशस्वी जीवनाची कल्पना केवळ त्याच्या कुटुंबापुरती, शहर किंवा समाजापुरती मर्यादित नव्हती, तर त्याला आपल्या देशाला अभिमान वाटेल, असे यश संपादन करायचे होते.
प्रतीकचे दहावीपर्यंतचे शिक्षण उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात मराठी माध्यमातून झाले. प्रतीकच्या उच्च शिक्षणासाठी 2004 मध्ये त्यांच्या वडिलांनी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र तिथे गेल्यावर प्रतीक अभिनय, नाट्यक्षेत्राशी जोडले गेले. या काळात त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेण्यास प्राधान्य दिले, त्यामुळे बारावीत कमी मार्क्स मिळाले. त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश न मिळाल्याने वडील नाराज झाले. 2007 मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच, प्रतीकला ‘हमने जीना सिख लिया’ नावाच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. ज्यात सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे, ओम भुतकर यांच्याही भूमिका होत्या. त्यांचाही हा पहिलावहिला सिनेमा होता. या अनुभवामुळे प्रतीकची अभिनय क्षेत्राविषयीची रुची अधिकच वाढवली आणि या क्षेत्रातच करिअर करण्याचा त्याचा संकल्प अधिकच मजबूत झाला. ज्यावेळी त्यानं अभिनेता होण्याचा दृढ निश्चय केला, त्याचवेळी नेमकं कौटुंबिक दबावामुळे त्यांना माघार घ्यावी लागली.
इंडस्ट्रीत ‘बॅक-डोअर एंट्री’ घेत प्रतीकने एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये मार्केटिंग हेड म्हणून काम करण्याचे ठरवले आणि अशा प्रकारे त्यानं मार्केटिंगमध्ये एमबीए करण्याचा निर्णय घेत, 2011 पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पुटर टेक्नॉलॉजी (पीआयसीटी) मध्ये प्रवेश घेतला.
प्रतीकने (पीआयसीटी) मध्ये टॉप 3 मध्ये येऊन थेट कॉव्हेन्टरी युनिव्हर्सिटी, इंग्लंड गाठले. तिथे त्यांना संधींचे संपूर्ण असे एक जग दिसले आणि त्यांनी यूकेला आपली ‘कर्मभूमी’ बनवण्याचा निर्णय घेतला. परदेशात टिकून राहणे हे सोपे काम नसले, तरी मिळालेल्या संधीचा सदुपयोग करण्याचे त्यानं ठरवले होते. आठवडाभरात पाच पार्ट टाईम नोकरी करण्यासोबतच, त्याचा अंतिम प्रबंध तयार करण्यासाठी, नव्याने सादर करण्यात आलेली व्हिसा शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी, पदवीधर उद्योजक व्हिसा मिळवण्यासाठी प्रतीकने कठोर परिश्रम घेतले, जे यूकेमधील केवळ 1 हजार विद्यार्थ्यांना एका अनोख्या व्यवसाय योजनेसह दिले जाणार होते. प्रतीकची ही मेहनत फळाला आली आणि 2014 मध्ये 'इंडियन मुव्ही फ्रेंड' (IMF) नावाच्या त्याच्या पहिल्या व्यावसायिक उपक्रमाचा जन्म झाला. नेटकरी प्रतीक शेलारची The Entrepreneur - A Documentary ही डॉक्युमेंट्री यूट्यूब वर सर्च करून पाहू शकतात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: