Trump Tariffs: टॅरिफचा जगभरातील देशांना शॉक; भारतावर डिस्काउंटेड रेसिप्रोकल टॅरिफ धोरणाचा काय परिणाम होईल?
Trump Tariffs: अमेरिकेच्या या निर्णयाचा फटका जगभरातील इतर सर्व देशांना बसू शकतो. ट्रम्प यांच्या या घोषणेचा अमेरिका-भारत व्यापार संबंधांवर खोलवर परिणाम होऊ शकतो.

Donald Trump Tariff On India: अमेरिकेने घेतलेल्या आणखी एका निर्णयाची झळ जगभरातील देशाला बसणार आहे. अमेरिकेला शक्तिशाली राष्ट्र म्हणून विकसित करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जशास तसे आयात शुल्क (टॅरिफ) लागू करण्याची घोषणा काल (बुधवारी 2 एप्रिल) रात्री उशिरा केली. त्यानुसार भारतावर 26 टक्के आयात शुल्क (Trump announces 26% tariffs on India) लादण्यात येणार आहे. अमेरिकेचा प्रमुख प्रतिस्पर्धी देश असलेल्या चीनवर 34 टक्के आयात शुल्क आकारले जाणार आहे. तर कंबोडियातून येणाऱ्या सर्व वस्तूंवर सर्वाधिक 49% दर लावले जातील. अमेरिकेच्या या निर्णयाचा फटका जगभरातील इतर सर्व देशांना बसू शकतो. ट्रम्प यांच्या या घोषणेचा अमेरिका-भारत व्यापार संबंधांवर खोलवर परिणाम होऊ शकतो.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सर्व देशांसाठी टॅरिफ जाहीर केले आहे. ट्रम्प यांनी त्याला ‘डिस्काउंटेड रेसिप्रोकल टॅरिफ’ असे नाव दिले आहे. दरांची घोषणा करताना ट्रम्प म्हणाले की, हा तो मुक्ती दिवस आहे ज्याची अमेरिका खूप दिवसांपासून वाट पाहत आहे. ट्रम्प यांनी भारतावर 26 टक्के शुल्क लादले आहे. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचा उल्लेख केला.
टॅरिफचा भारतावर काय परिणाम होईल?
भारत आणि अमेरिकेतील व्यापार आधीच अनेक मुद्द्यांवरून तणावपूर्ण आहे. या आयात शुल्कामुळे भारतीय कंपन्यांना अमेरिकेत व्यवसाय करणे महागात पडू शकते. भारतीय उत्पादनांवर जास्त कर लादल्याने अमेरिकन ग्राहकांना महागड्या वस्तू खरेदी करण्यास भाग पाडले जाऊ शकते. भारतातून कच्चा माल किंवा तयार उत्पादने आयात करणाऱ्या अनेक अमेरिकन कंपन्यांच्या किमतीही वाढू शकतात. दरम्यान, भारत आणि इतर प्रभावित देश प्रत्युत्तरात्मक उपाययोजना करू शकतात आणि अमेरिकन उत्पादनांवर शुल्क वाढवू शकतात. यामुळे जागतिक व्यापार युद्ध सुरू होऊ शकते. तथापि, ट्रम्पचा दावा आहे की या आयात शुल्कामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित केले जाईल.
भारत हा सवलतीच्या परस्पर शुल्कामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांपैकी एक आहे. तज्ज्ञांच्या मते, काही भारतीय निर्यातीला जास्त आयात शुल्काला सामोरे जावे लागू शकते. SBI च्या अहवालानुसार, भारताला या टॅरिफमुळे फारसे नुकसान होणार नाही. भारताच्या निर्यातीत 3-3.5% ने घट होऊ शकते. बांधकाम आणि सेवा क्षेत्रातील निर्यात वाढल्याने परिणाम कमी होईल. युरोप-मध्य-पूर्व-अमेरिकेतून नवीन व्यापारी मार्ग तयार केले जात आहेत. भारताने आपल्या निर्यातीमध्ये विविधता आणली आहे.
‘डिस्काउंटेड रेसिप्रोकल टॅरिफ’ची घोषणा करण्यापूर्वी, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी या महिन्याच्या सुरुवातीला वॉशिंग्टनला भेट दिली होती. जिथे त्यांनी द्विपक्षीय व्यापार करारावर (BTA) चर्चा केली, ज्यामध्ये या गोष्टीवरती सूट मागितली गेली होती.
तज्ज्ञांच्या मते, या दराचा सर्वात वाईट परिणाम वस्त्रोद्योग, परिधान क्षेत्र आणि ज्वेलरी या क्षेत्रावर होऊ शकतो. 2023-24 मध्ये, अमेरिकेचा भारतातून सुमारे $36 अब्ज (सुमारे 3 लाख कोटी) किमतीच्या कापड निर्यातीत 28% वाटा होता, जो सुमारे $10 अब्ज (सुमारे 85,600 कोटी रुपये) आहे. वर्षानुवर्षे या क्षेत्राने अमेरिकेसोबतच्या भारतीय व्यापारात वाढ केली आहे. 2016-17 आणि 2017-18 मध्ये कापड उद्योगातील एकूण निर्यातीतील अमेरिकेचा वाटा 21% होता, 2019-20 मध्ये 25% आणि 2022-23 मध्ये 29% पर्यंत पोहोचला. 2030 पर्यंत 500 बिलियन अमेरिकी डॉलर व्यापाराचे दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवून वर्षाच्या अखेरीस दोन्ही देशांनी व्यापार करार पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.
भारताची उभी राहत असेली अर्थव्यवस्था, ज्याची व्यावसायिक धोरणे सतत विकसित होत आहेत. सवलतीच्या परस्पर टॅरिफमुळे भारताला त्याच्या व्यापार धोरणांमध्ये समतोल साधता येईल. या धोरणामुळे, भारत भारतीय निर्यातीवर उच्च शुल्क लावणाऱ्या देशांवर शुल्क लादू शकतो. यामुळे भारतीय उत्पादनांची स्पर्धात्मक शक्ती वाढेल आणि स्थानिक उद्योगांना आधार मिळेल. वाढत्या शुल्कामुळे, आयात केलेल्या वस्तूंच्या किमती वाढू शकतात, ज्यामुळे ग्राहकांच्या खिशावर भार पडू शकतो.
अमेरिकेचे कोणत्या देशावर किती शुल्क
याअंतर्गत चीनवर 34%, युरोपियन युनियनवर 20%, दक्षिण कोरियावर 25%, भारतावर 26%, जपानवर 24% आणि तैवानवर 32% शुल्क लादण्यात आलं आहेत. ट्रम्प म्हणाले की, इतर देश अमेरिकेपेक्षा जास्त शुल्क आकारतात, ज्यामुळे अमेरिकन उद्योगाचे नुकसान झाले. याव्यतिरिक्त, मध्यरात्रीपासून सर्व परदेशी-निर्मित वाहनांवर 25% कर लागू झाला आहे.
नरेंद्र मोदी चांगले मित्र, पण...
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे सर्वांत चांगले मित्र असूनही भारत अमेरिकेशी योग्य वागत नाही. त्यांनी आरोप केला की भारत अमेरिकन उत्पादनांवर 52 टक्के कर लादत असल्याने अमेरिकाही त्या बदल्यात 26 टक्के कर लादेल.























