Masterchef India 7 : 'मास्टरशेफ इंडिया 7'चा विजेता नयनज्योती सेकिया! महाराष्ट्राच्या सुवर्णा बागुलने पटकावला तिसरा क्रमांक
Nayanjyoti Saikia : 'मास्टरशेफ इंडिया 7'च्या ट्रॉफीवर नयनज्योती सेकियाने नाव कोरलं आहे.
Nayanjyoti Saikia Masterchef India 7 Winner : 'मास्टरशेफ इंडिया 7'चा (Masterchef India 7) विजेता कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता या पर्वाच्या विजेत्याची घोषणा झाली असून नयनज्योती सेकिया (Nayanjyoti Saikia) या पर्वाचा विजेता ठरला आहे. नयनज्योतीला 25 लाख रुपयांचा चेक, ट्रॉफी आणि गोल्डन शेफचा कोट देण्यात आला आहे.
'मास्टरशेफ इंडिया'चं हे पर्व खूपच खास होतं. या पर्वातील स्पर्धकांनी वेगवेगळे पदार्थ बनवून परिक्षकांना खूश केलं आहे. तसेच त्यांनी बनवलेले पदार्थ चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. या पर्वाचा विजेता नयनज्योती सेकिया होणार असा अंदाज वर्तवला जात होता. महाअंतिम सोहळ्यातील त्याचा फोटोदेखील व्हायरल झाला होता. अखेर आता या पर्वाचा विजेता नयनज्योती सेकिया ठरल्याने त्याच्या चाहत्यांना आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
View this post on Instagram
नयनज्योतीने आपली स्वयंपाकाची आवड कशी जोपासली?
नयनज्योतीने 'मास्टरशेफ इंडिया 7'मध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. गोड पदार्थ ही नयनज्योतीची खासियत आहे. तसेच वेगवेगळे पदार्थ त्याने परिक्षकांना खाऊ घातले आहेत. 26 वर्षीय नयनज्योतीने हॉटेल मॅनेजमेन्टचा कोणताही कोर्स केलेला नाही. पण स्वयंपाकाची आवड असल्याने पदार्थांमध्ये वेगवेगळे प्रयोग करत त्याने आपली आवड जोपासली आहे.
नयज्योतीचं जेवण बनवणं वडिलांना पसंत नव्हतं
'मास्टरशेफ इंडिया 7' आधी नयनज्योती 'नॉर्थइस्ट कुकिंग चॅंपियनशिप'मध्ये सहभागी झाला होता. या कार्यक्रमाचादेखील तो विजेता झाला होता. नयनज्योतीला स्वयंपाकाची आवड असली तरी त्याच्या वडिलांना मात्र त्याची ही गोष्ट आवडत नव्हती. पण शेफ विकास खन्ना यांनी त्याच्या वडिलांना समजावलं आणि नयनज्योती 'मास्टरशेफ इंडिया 7'पर्यंत पोहोचला.
महाराष्ट्राच्या सुवर्णा बागुलने पटकावला तिसरा क्रमांक
'मास्टरशेफ इंडिया 7'चा विजेता नयनज्योती झाला असला तरी आसाममधील सांता सर्माने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर महाराष्ट्राच्या सुवर्णा बागुल यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. सांता आणि सुवर्णा यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा चेक आणि मेडल देण्यात आलं आहे. 'मास्टरशेफ इंडिया 7'च्या अंतिम टप्यात कमलदीप कौर, अरुणा विजय, प्रियंका कुंडी बिस्वास, सचिन खटवानी, गुरकिरत सिंह, सुवर्णा बागुल, संता सरमाह आणि नयन ज्योती हे आठ स्पर्धक पोहोचले होते.
संबंधित बातम्या